जमिनीवर या

राज्यसभा निवडणूक निकालांमुळे तरी राज्यातील महाविकास आघाडी जमिनीवर येईल अशी अपेक्षा आहे. ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री असूनही आमदारांच्या निष्ठेबाबत पुरेशी खात्री देता येत नाही अशा दारूण अवस्थेतील शिवसेना आणि तीन पक्षांमध्ये अजिबात नसलेला ताळमेळ हे चित्र पाहता, या सरकारचा कारभार ठीक चाललेला नाही असे गेल्या आठवड्यात याच स्तंभामध्ये आम्ही म्हटले होते. निकालानंतर ते पूर्ण सत्य असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक लढवायची म्हणून लढवली नव्हती असे देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर म्हटले आहे. ते खरेच आहे. निवडणुकीत विजयासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो हे अलिकडे वारंवार दिसले आहे. दोन वर्षांपूर्वी हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शहा, आदित्यनाथ यांच्यापासून सगळे नेते उतरले होते. महाराष्ट्रात मुंबईसह बाकीच्या पालिका निवडणुकीत लवकरच आपल्याला तशीच घमासान लढाई बघावी लागणार आहे.  त्यामुळे राज्यसभा निवडणूक ही सरळपणे पार पडणार नाही हे अपेक्षितच होते. संभाजीराजांना उमेदवारी न देऊन सेनेने विश्‍वासघात केला असा प्रचार आधी भाजपने केला. पण त्याचा फायदा झाला नाही. सेनेने साधे कार्यकर्ते असलेल्या संजय पवारांना मैदानात उतरवून भाजपवर मात केली. पण कोल्हापूरचे धनसत्ताधीश आणि सर्वपक्षमित्र धनंजय महाडिक यांना अतिरिक्त जागेसाठी उभे करून भाजपने बाजी पलटवली. इतरांपेक्षा कितीतरी जास्त असलेली एकगठ्ठा – म्हणजे 106 – मते ही भाजपची ताकद होती. ती त्यांनी नीट वापरली. अशा अप्रत्यक्ष रीतीने होणार्‍या निवडणुकांमध्ये दुसर्‍या पसंतीच्या मतांच्या नियोजनालाच सर्वाधिक महत्व असते. शरद पवारांसारखे निष्णात नेते असतानाही आघाडीकडून यात ढिसाळपणा झाला की दगाबाजी हे शोधावे लागेल. संजय राऊतांच्या मते तीन जणांनी फितुरी केली. तर त्या तिघांनी याचा इन्कार केला आहे. पवारही म्हणतात की मते फुटलेली नाहीत. पण भाजप गटाच्या एकूण मतांपेक्षा जास्त मते महाडिकांना पहिल्या फेरीतच मिळालेली दिसत आहेत. त्यामुळेच तर संजय पवार यांची दुसर्‍या पसंतीची मते मोजली जाण्याआधीच निकाल लागून गेला. आता निवडणूक होऊन गेल्यावर तरी आघाडीला आपल्या मतांचा हिशेब नीट लावता येईल अशी आशा आहे. निकालानंतर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी हा संजय पवारांचा पराभव नव्हे तर घोडेबाजाराचा विजय झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा कोल्ह्याला द्राक्षे आंबट यासारखा प्रकार झाला. शिवसेना नेते हितेंद्र ठाकूर आणि बाकीच्या अपक्ष व छोट्या पक्षांकडे केवळ विशुध्द पाठिंब्यासाठी गेले होते असे राऊत यांना म्हणायचे आहे काय? पण राऊत यांना टीव्ही वाहिन्यांपुढे चमकदार बोलण्याची सवय झाली आहे. भाजपसोबतच्या प्रचारयुद्धात राऊत यांची ही तोंडी हाणामारी उपयोगी असली तरी बुद्धिबळाच्या खेळात ती निरुपयोगी आहे. वृत्तवाहिन्यांना रोज सकाळ-संध्याकाळ बाईट्स देणे म्हणजे राजकारण करणे नव्हे, हे जितक्या लवकर त्यांना उमजेल तेवढे बरे. एकीकडे आमिषे आणि दुसरीकडे ईडी किंवा सीबीआय चौकशी मागे लावण्याची धमकी या दोन्ही आयुधांचा भाजप सर्रास उपयोग करीत असते हे आता उघड गुपित आहे. त्याला शह देण्यात आघाडीचे नेते सातत्याने अपयशी ठरत आहेत. राज्यसभा निवडणूक हे त्याचे आणखी एक उदाहरण आहे. अलिकडे भाजपने राज्य सरकारच्या राजीनाम्याची किंवा ते खाली पाडण्याची भाषा बंद केली आहे. त्याऐवजी, फडणवीस यांनी उद्धव यांना आता तरी चांगला कारभार करून दाखवा असे म्हटले आहे. आघाडीने त्यांचा सल्ला आता खरेच मनावर घ्यायला हवा. अन्यथा, जनतेच्या मनात त्यांच्याविषयी असलेली सहानुभूती घटत जाईल. यावेळच्या मतदानादरम्यान भाजपने तांत्रिक आक्षेप घेऊन आघाडीचे एक मत बाद करवण्यात यश मिळवले. आघाडीतील तीनही पक्षांना प्रत्येक क्षणी किती सावध राहण्याची गरज आहे हे पुन्हा एकवार दिसून आले. आता पुढची कसोटी विधानपरिषदेच्या वीस जूनला होणार्‍या निवडणुकीत लागणार आहे. तिथेही भाजपने सदाभाऊ खोतांना अपक्ष उभे करून अतिरिक्त जागा पदरात पाडण्याचे डावपेच आखले आहेत. राज्यसभेच्या निकालातून आघाडीचे नेते किती शहाणपणा शिकले आहेत हे त्यावेळी दिसेलच.

Exit mobile version