सोने आणि पितळ

दसर्‍याच्या निमित्ताने महाराष्ट्रात इतकी काही सोन्याची इतकी लुटालूट होते की तो विक्रम तात्काळ गिनिज बुकमध्ये नोंदवला जायला हवा. पुन्हा हे सोनं साधंसुधं किंवा किरकोळ चोवीस कॅरटवालं, दहा ग्रॅमला 52 हजार रुपयेवालं नसतं. ते त्याहूनही भारी असं विचारांचं सोनं असतं. ही लुटालूट आजच नव्हे तर गेली पन्नास वर्षे तरी चालू आहे. नागपूर, मुंबई, भगवानगड अशी या लुटीची सध्याची प्रमुख ठिकाणे आहेत. या सोन्याचं किंवा सोन्यासारख्या विचारांचं नंतर होतं काय असा प्रश्‍न कदाचित काहींना पडू शकेल. अलिकडपर्यंत शिवाजी पार्कवरच्या सोने-लुटीला मिडियात अधिक भाव वाव होता. पण आता दिल्ली व मुंबईतील सत्ताबदलामुळे नागपुरातील शिस्तबद्ध लुटालुटीला अधिक भाव आलेला आहे. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सैनिक आधी लाठ्याकाठ्या फिरवतात आणि मग सरसंघचालक सोन्यासारखे विचार वाटतात. बुधवारच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी महिलांना समान अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं प्रतिपादन केलं. एव्हरेस्टवर दोनदा चढाई करण्याचा विक्रम करणार्‍या संतोष यादव यांना यंदाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावण्यात आलं होतं. अर्थात भागवतांनी स्वातंत्र्य, हक्क इत्यादींची भाषा केली तरी प्रत्यक्षात महिलांच्या मातृशक्तीवरच त्यांनी अधिक भर दिला. म्हणजे जे जुने तेच आमच्यासाठी सोने हा संघाचा दृष्टिकोन काही बदललेला नाही. संघाच्या कार्यकारी मंडळात किंवा निर्णय प्रक्रियेत आजवर महिलांना स्थान मिळालेले नाही. संघ पूर्वी ज्या महात्मा गांधींचा द्वेष करीत असे त्यांच्या प्रेरणेमुळे हजारो महिला स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्या. या घडामोडीला संघाच्या जन्माइतकीच म्हणजे सुमारे शंभर वर्षे झाली. संघाच्या दृष्टीने मात्र, पूर्वीपासून, मुलग्यांना जन्म देतात इतकेच महत्व महिलांना होते. भागवतांच्या भाषणावरून संघाची ही दृष्टी फार बदललेली आहे असे दिसत नाही. बोलता बोलता भागवतांनी भारतात स्त्रियांची जी गुलामगिरी होती त्यालाही परकीय म्हणजे मुस्लिम आक्रमकांना जबाबदार धरले, असे काही बातम्यांमध्ये म्हटले आहे. खरे तर मनुस्मृतीच्या काळापासून स्त्रियांना अतिशय हीनरीत्या वागवले जाते हा इतिहास आहे. याबद्दल स्पष्ट पश्‍चाताप, खेद व्यक्त करून भागवतांनी आजचे आधुनिक विचार मांडायला हवे होते. पण तसे केले तर आमची पाच हजार वर्षांपासूनची हिंदू संस्कृती महान असे म्हणता येत नाही. अस्पृश्यता, हिंदू धर्मातील इतर मागास व दुष्ट परंपरा यांची कबुली द्यावी लागते. विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी या परंपरा तयार झाल्या अशी टीका करावी लागते. पण असे विशिष्ट लोक हेच तर भागवतांच्या आजूबाजूला आणि समर्थकांमध्ये अधिक संख्येने असतात. त्यांना दुखावून चालत नाही. म्हणून मग मातृशक्ती वगैरे गोल-गोल भाषा करीत नवीन विचार मांडत असल्याचे दाखवावे लागते. देशाची सत्ता आज संघ आणि भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यामध्ये प्रचंड काहीतरी अर्थ असल्याप्रमाणे माध्यमे अशा भाषणांना प्रसिध्दी देत राहतात. भागवतांनी याच भाषणात सर्व लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण हे सर्वांना सारख्याच रीतीने लागू पाहिजे असे मत व्यक्त केले. मुस्लिमांमध्ये हिंदूंच्या तुलनेत अधिक मुले जन्माला घातली जातात व भारत देशाला मुस्लिम राष्ट्र करण्याच्या कटाचा हा एक भाग आहे असा एक समज सामान्य हिंदूंमध्ये अनेक वर्षांपासून पसरवण्यात आला आहे. भागवत हेदेखील आडून आडून तोच समज घट्ट करत आहेत. प्रत्यक्षात सरासरी पाहिली तर मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर हा हिंदूंइतकाच किंवा अधिक घटतो आहे असे आकडे सरकारच्याच हवाल्याने अलिकडे प्रसिद्ध झाले होते. त्याकडे लक्ष न देता भागवतांसारख्या जबाबदार व्यक्तीने जुनेच विचार सोने म्हणून वाटावेत हे योग्य नाही. भागवतांनी या भाषणात उदयपूर व अमरावती येथील हिंदूंच्या हत्यांचा उल्लेख केला. मात्र हा निषेध करताना आणि भाषणभर महिलांबाबत कळवळा दाखवताना भागवत बिल्किसबानूवर बलात्कार करणार्‍यांची सुटका आणि त्यानंतर गुजराती हिंदूंनी केलेला जल्लोष याबाबत चकार शब्दाने बोलत नाहीत. एखाद्याचे पितळ उघडे पडणे हा शब्दप्रयोग भागवत व त्यांच्या भक्तांना ठाऊक असेलच.

Exit mobile version