काश्मीरचा राजा हिंदू होता. प्रजा मुसलमान. फाळणीनंतर काश्मीर कोठे जाणार असा प्रश्न होता. राजा हरिसिंगांनी भारतात सामील होण्याचं ठरवलं. प्रजेचाही पाठिंबा होता. मात्र काश्मीरला भारतातच राहून अधिक स्वायत्तता मिळावी असं तिचं म्हणणं होतं. शेख अब्दुल्लांनी त्यासाठी आंदोलन उभारलं. पण तरीही राज्यात हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी फूट कधी पडली नव्हती. 1989 मध्ये दहशतवाद्यांनी जोर केला. पंडित म्हणजे हिंदूंना वेचून मारले गेले. हजारो पंडित कुटुंबकबिल्यासह काश्मीरमधून बाहेर पडले. त्यांची परवड झाली. पण याच काळात काश्मिरातील हजारो मुस्लिमांचीही हत्या झाली. मीरवाईज म्हणजे त्यांच्या धर्मगुरुंचेही बळी गेले. महिलांवर अत्याचार करण्यात आले. दहशतवादी हे मुस्लिम होते. अल्ला हो अकबरसारखे मुस्लिम नारे ते देत होते. पाकिस्तान या मुस्लिम राष्ट्राचा त्यांना पाठिंबा होता. पण त्यांचे मुख्य लक्ष्य भारत सरकारची ताकद कमजोर करणे हे होते. त्यामुळेच ते आपल्याच धर्माच्या लोकांना देखील क्रूरपणे मारत होते. अनेक मुस्लिम पोलिसांमध्ये वा भारतीय सैन्यात होते. त्यांना वा त्यांच्या कुटुंबियांनाही मारण्यात आले. काश्मिरी जनतेला, पंडितांना आणि काश्मीरबाहेरच्या सूज्ञ लोकांना याची जाणीव होती. भाजपलाही ती होतीच. पण त्यांना केवळ लोकांच्या भावना चाळवून मते घ्यायची होती. याला पुरावा आहे. भाजपने पुढे जाऊन मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षासोबत युती करून सरकारही स्थापन केले. मेहबुबा यांचा पक्ष काश्मिरला अधिक स्वायत्तता मिळावा या बाजूचा होता व आहे. उद्या वेळ पडली तर ही पुन्हादेखील अशीच युती होऊ शकेल. पण भाजपचा प्रचार असा होता की काश्मिरात हिंदू विरुध्द मुसलमान यांचं जणू धर्मयुध्द चालू आहे. याच मुद्द्याला धरून काश्मीर फाईल्स नावाचा सिनेमा काढण्यात आला. त्यात पंडितांचे कसे शिरकाण झाले, त्यांना कसे नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडावे लागले हे दर्शवण्यात आले. पण वर म्हटल्याप्रमाणे ही केवळ एक बाजू होती. त्याच काळात ज्या हजारो मुस्लिमांची हत्या झाली त्याविषयी चित्रपट अवाक्षरही काढत नाही. याखेरीज या चित्रपटात तपशीलाच्या अनेक चुका आहेत. काँग्रेस, नेहरू, इंदिरा गांधी यांच्यावर सर्व खापर फुटेल अशा रीतीने त्याची मांडणी करण्यात आली आहे. पण दुर्देवाने मोदी सत्तेत आल्यापासून देशातील लोकांची फाळणी झाली आहे. मोदींचे भक्त असलेले आणि भक्त नसलेले असे गट पडले आहेत. मोदी आणि भाजपची भूमिका मांडणारे साहित्य, नाटक, सिनेमा किंवा टीव्ही चॅनेल हे कितीही खोटे असले तरी भक्त लोक त्यांना उचलून धरतात. या बाबतीत ते आंधळे झाले आहेत. खुद्द मोदीही आपल्या पदाची शान वगैरे गोष्टी विसरून अशा बोगस लोकांना ट्विटरवर आपले मित्र मानतात, किंवा अशा साहित्य वा सिनेमाला उचलून धरतात. काश्मीर फाईल्सवर जाणकारांनी टीका करूनही मोदी यांनी त्याचे नाव घेऊन प्रशंसा केली. हा सिनेमा पाहावा अशी शिफारस केली. भाजपवाल्यांनी त्याचे खेळ प्रायोजित केले. या वातावरणानंतर तो ऑस्करला गेला नाही हेच आश्चर्य. पण तो गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धा विभागात दाखल करण्यात आला. या महोत्सवाचे आयोजक भारत सरकार असल्याने त्यांच्या दबावापोटी या सिनेमाला काही ना काही सन्मान मिळेल असे सर्वांना वाटत होते. पण महोत्सवासाठी आलेल्या परदेशी ज्यूरी लोकांनी घात केला. त्यांनी हा चित्रपट म्हणजे घाणेरडा प्रचारपट असल्याचे जाहीर केले. सिनेमाचे निर्माते आणि भारत सरकार यांच्या कानाखाली आवाज काढण्यासारखाच हा प्रकार होता. पण त्यांनी हा स्वतःहून ओढवून घेतलेला अपमान होता. विशेष म्हणजे ज्युरींतर्फे त्यांचे मत वाचून दाखवणारा नदाव लेपिड हा इस्राईलचा आहे. याच इस्राइलचे भाजपला फार प्रेम आहे. इस्राईलने गाझा पट्टीतून पॅलेस्टिनींना ज्या रीतीने हाकलून दिले त्याप्रमाणे काश्मिरातून मुस्लिमांना बेदखल केले जायला हवे असे अनेक भाजपवाल्यांना वाटते. 370 वे कलम रद्द करून बाहेरच्या लोकांना तेथे जमीन खरेदीची परवानगी देण्यामागे हाच हेतू आहे असे सांगतात. त्यामुळे नदावने मारलेल्या या ‘थप्पडेची गूंज’ बराच काळ निनादत राहणार आहे.