भारत हा एक अद्भुत देश आहे. एकाच वेळी तिथे पाचवे, दहावे, पंधरावे आणि एकविसावे शतक नांदत असते. एकीकडे हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या नांगराने आणि त्यावेळच्या तंत्राने आपल्याकडची शेती केली जाते. दुसरीकडे अमेरिकेच्या तोडीस तोड हरितगृहे उभारून अत्याधुनिक तंत्राने पिके काढली जातात. याचाच एक मासला पशुसंवर्धनामध्येही पाहायला मिळाला आहे. गाय हा आपल्याकडचा एकदम संवेदनशील विषय आहे. तिला देवाचे स्थान देऊन त्याभोवती मोठे राजकारण उभे राहिले आहे. त्यातूनच उत्तरेकडच्या हिंदी राज्यांना गायपट्टा असे नाव पडले आहे. आता या गायपट्ट्यातील संस्थेच्या शास्त्रज्ञांनी गीर गायीचे यशस्वी क्लोनिंग केले आहे. हरियाणातील कर्नालच्या राष्ट्रीय दूध संशोधन केंद्रामध्ये यंदाच्या सोळा मार्चला गंगा नावाची गाय या तंत्राने जन्माला घालण्यात आली. जन्मतः तिचे वजन चांगले म्हणजे 32 किलो होते. चौदा वर्षांपूर्वी याच संस्थेमध्ये समरुपा नावाची क्लोन केलेली रेडी (म्हैस) जन्माला घालण्यात आली होती. मात्र ती अवघ्या पाच दिवसात मरण पावली होती. त्या पार्श्वभूमीवर गंगाची प्रगती दोन महिन्यांनंतरही समाधानकारक आहे. संशोधनासाठी म्हशीच्या गर्भाशयातील पारडू जन्माला घालणारी पेशी कत्तलखान्यांमधून मिळवता आली. गायीच्या बाबतीत असे करणे शक्य नव्हते. तिला हातदेखील लावणे अवघड होते. मात्र संशोधकांनी मोठ्या चिकाटीने त्यावर मात करून गायीच्या शरिरातील पुनरुत्पादन करणारी पेशी मिळवली व ती दुसर्या गायीच्या शरीरात वाढवली. या प्रयोगासाठी मुद्दामच गीरसारख्या देशी वंशाची निवड करण्यात आली. भारतासारख्या उष्ण कटिबंधामध्ये गीर, साहिवाल किंवा लाल कंधारी या स्थानिक प्रजाती तीव्र हवामानाला व रोगांच्या प्रादुर्भावाला तोंड देऊ शकतात. शिवाय त्यांचे दुधाचे उत्पादनही चांगले असते. आपल्याकडच्या खिल्लारी, डांगी, देवणी, गवळाऊ इत्यादी गायी विविध प्रदेशांमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी योग्य मानल्या जातात. मात्र त्यांचे दुधाचे उत्पादन परदेशी संकरित गायींच्या तुलनेत कमी असते. हरितक्रांतीनंतर शेतीतील पिकांप्रमाणेच गायी, म्हशी, बकर्या यांच्यामध्येही संकरित वंशाच्या पशुंना पसंती वाढू लागली. जर्सी गायी लोकप्रिय ठरल्या. त्यांच्यासाठी कर्जेही सहज मिळत. यामुळे त्यांचा प्रसार झाला. मात्र लम्पी किंवा तत्सम आजारांचा प्रादुर्भाव यासारख्या प्रजातींमध्ये फार वेगाने होतो असे आढळून आले आहे. त्यामुळे पुन्हा देशी वंशाकडे लोक वळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, गीर गायीच्या क्लोनिंगच्या प्रयोगाबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. समरुपाच्या प्रयोगानंतर देशात गरिमा ही पारडी जन्माला घालण्यात आली. काश्मिरात पश्मिना शाल जिच्यामुळे प्रसिध्द आहे त्या मेंढीचेही क्लोनिंग केले गेले. मात्र अशा 27 पैकी केवळ बारा क्लोन करून जन्माला आलेली रेडके, मेंढ्या वा वासरे जगू शकलेली आहेत. त्यांचे आयुष्यमान वाढवणे व त्यांच्याकडून हवे तसे दूध वा लोकरीचे उत्पादन घेऊ शकणे हे पुढच्या टप्प्यात होईल. तूर्तास धार्मिक मुद्दे मध्ये न आणता असे प्रयोग आपल्याकडे होत आहेत हेच महत्वाचे आहे.