एकविसाव्या शतकात जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा आणि ज्याचा शेअर बाजार साठ हजार, सत्तर हजार असा धावतो आहे अशा देशाच्या आर्थिक राजधानीपासून केवळ शे-दीडशे किलोमीटर अंतरावर हजारो लोक दगडकपारीत जीव मुठीत धरून जगताहेत हे भीषण वास्तव आहे. माध्यमांमध्ये चोवीस तास चिवडला जाणारा राजकारणाचा चिखल आणि सोशल मिडियामधून कोसळणारे चमकदार घटनांचे डोंगर यांच्या दरडींखाली हे वास्तव रोजच्या रोज खोल गाडले जात असते. कधी कधी निसर्गालाच हे सर्व असह्य होत असावे आणि त्या कडेकपारीतल्या आयुष्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तो असले उफराटे प्रपात घडवत असावा. इर्शाळवाडीत बुधवारी रात्री जे काही घडले तो निसर्गाचा प्रकोप खराच, पण तिन्ही त्रिकाळ आर्थिक विकासाचा गजर करणारा समाज आपल्यापैकीच काही लोकांना जेव्हा किड्यामुंगीइतकीच किंमत देतो तेव्हा काय घडते याचेही ते उदाहरण आहे. इर्शाळवाडीच्या वस्तीत काही मिनिटांमध्ये होत्याचे नव्हते झाले. हा मजकूर लिहित असेपर्यंत मृतांचा आकडा 15 आहे व तो वाढण्याची शक्यता आहे. अनेकांना वाचवण्यातही यश आले आहे. भीती व्यक्त होते आहे त्यानुसार फार मनुष्यहानी झाली नसेल तर ते चांगलेच आहे. पण तरीही घटनेचे गांभीर्य कमी होणारे नाही. काल संध्याकाळपर्यंत एक नांदती असणारी वस्ती आज दरडीखाली दबून गेली आहे आणि तिथल्या माणसांच्या आयुष्यात अचानक अंधःकार पसरला आहे. मुख्यतः आदिवासी ठाकर समाजाची वस्ती असलेल्या या वाडीत 48 कुटुंबातील सुमारे सव्वादोनशे लोक राहत होते. पण या वाडीत जाण्यासाठी धड रस्ता नाही, केवळ पायवाट आहे. मदत कार्यात त्यामुळे प्रचंड अडथळे आले. या वस्तीकडे जाण्यासाठी उभा चढ चढून जाताना एका जवानाला प्राणाला मुकावे लागले. अशा या दुर्गम परिसरात इथल्या लोकांची आयुष्येच नव्हे तर अनेक पिढ्या गुजरल्या आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. या घटनेच्या निमित्ताने तरी बाकीच्या समाजाचे त्यांच्याकडे लक्ष जाईल अशी आशा आहे.
नेत्यांना थांबवा
अशा प्रसंगांमध्ये मदत व पुनर्वसन कार्यामध्ये अलिकडे फार सफाई आली आहे. त्यामुळे रायगडचे प्रशासन काल घटना घडल्यापासून दोन-तीन तासात तेथे दाखल झाले. तळिये किंवा मावळातल्या माळीणच्या दुर्घटनांमधील कामाचा अनुभवही सरकारच्या गाठीशी आहे. मात्र मोबाईल फोन आणि जेसीबी यंत्रांच्या सुविधाही नाकाम ठराव्यात असे प्रदेश आपल्याच अवतीभवती आहेत आणि पावसाच्या मार्यापुढे आपण हतबल ठरू शकतो याचा अनुभव या यंत्रणेला गुरुवारी आला. या सर्व संकटांवर मात करून जवानांनी जे अथक परिश्रम केले व पुढचे चार-पाच दिवस ते करतील त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. अशा घटना घडताच राजकारणी मंडळी तेथे धाव घेतात. आपले सध्याचे मुख्यमंत्री तर यात सर्वात पुढे असतात. गुरुवारी ते दोन तास अवघड चढण चढून प्रत्यक्ष घटनास्थळी गेले. त्यांचे व इतरांचे असे धावून जाणे हे तेथील जवानांना स्फूर्ती देते की मदतकार्यात अडथळे निर्माण करते हे सांगणे कठीण आहे. पण आधीच विविध प्रश्नांनी कावलेली सरकारी यंत्रणा नेत्यांभोवती गुंतून पडणे हे काही फारसे चांगले नव्हे. मुख्यमंत्री वा अन्य लोक नियंत्रण कक्षातून घटनास्थळावरच्या स्थितीचा सहज आढावा घेऊ शकतात. त्यांना योग्य त्या सूचना करू शकतात. काल ते घटनास्थळी आल्यानंतर दुर्घटनेचे दुःख बाजूला राहिले आणि टीव्ही वाहिन्या मुख्यमंत्री अवघड स्थितीतही तेथे कसे पोचले याचीच गौरवपर वर्णने करू लागली. उद्या चुकून पंतप्रधान येथे आले तर मग पाहायलाच नको. प्रशासनासाठी इथून पुढचे दिवस अधिक खडतर असतील. दहा ते वीस फूट दगडमातीचा ढिगारा उपसणे हेच आव्हानात्मक आहे. उद्या-परवा कदाचित या भागात एकाएकी मदत साहित्याचा व बघ्या माणसांचा पूर येईल. तो रोखावा लागेल. या घटनेतून वाचलेल्यांना आर्थिक व मानसिक आधार द्यावाच लागेल. पण ते दीर्घ काळ चालणारे काम असेल.
सह्याद्री वाचवा
सह्याद्री हा पर्यावरणदृष्ट्या अत्यंत नाजूक प्रदेश असल्याचे माधव गाडगीळ समितीने सांगितले आहे. सत्य हे आहे की, आपण आपला हा प्रिय सह्याद्री पालघरपासून कोल्हापूरपर्यंत सर्व बाजूंनी पोखरून टाकलेला आहे. द्रुतगती महामार्ग, रस्ते, पूल, रेल्वेमार्गाचे शॉर्टकट, बोगदे, डोंगरात हॉटेले, शेतघरे, लवासासारख्या वस्त्या, नवीन महाबळेश्वरसारखी शहरे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील खाणी असा हा तथाकथित विकास दिवसागणिक वाढत चालला आहे. शतकानुशतके उन्हापावसात बेडरपणे उभे असलेले सह्यकडे आपण खिळखिळे करीत आहोत. याला आळा घालण्याची मागणी हीदेखील मागास मानली जात आहे. तसे प्रयत्न तर दूरच राहिले. माधव गाडगीळांच्या ज्ञानाविषयीच शंका घेणारे लोक महाराष्ट्राच्या राजकारणात नेते म्हणून वावरत आहेत. माळीण किंवा आता इर्शाळवाडीसारख्या घटना घडल्या की आपल्या चुकांची तात्पुरती जाणीव होते. पण ही उपरती फार काळ टिकत नाही. हवामानातील बदलांमुळे थोड्या काळात प्रचंड पावसाच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. इर्शाळगडाच्या आसपास गेल्या दोन दिवसात पाचशे तर वर लोणावळ्यात सातशे मिलीलीटर पाऊस झाला. प्रचंड वृक्षतोड आणि वाटेल तसे कापलेले डोंगरकडे यामुळे हे इतके पाणी धरून ठेवेल अशी भूरचना कमी होत चालली आहे. त्यातून मग सावित्री नदीला अचानक पूर येणे किंवा दरडी कोसळणे असे प्रकार वाढतात. इर्शाळवाडीची घटना हा त्यातलाच प्रकार आहे. राज्यकर्ते, प्रशासन व आपण जनता यांनी आता तरी या सर्वांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पर्यावरण रक्षण हा निव्वळ फावल्या वेळच्या चर्चेचा विषय राहिलेला नाही. तो आपल्या सर्वांच्या घरादाराशी येऊन भिडलेला आहे. इर्शाळवाडी ही दूर डोंगरकपारीतली दुर्घटना नाही. ती कोकणात कधीही कोठेही घडू शकेल अशी स्थिती आहे. तिथे डोंगर कोसळला, दुसरीकडे पूर येईल. अन्य कोठे गावे समुद्राखाली जातील. निसर्गाचे ऐका- सावध व्हा.