जयंत माईणकर
गुजरात सरकारने, अहमदाबादसह चार शहरात मांसाहारी पदार्थ विकणार्या विक्रेत्यांना यामध्ये गंध आणि स्वच्छता या कारणास्तव रस्त्याच्या (स्ट्रीट फूड) बाजूला मांसाहारी पदार्थ विकण्यास बंदी घातली तर दुसरीकडे मुस्लिम नाव असलेल्या गावांच्या नामांतराची एक लांबलचक यादी तयार होत आहे आणि भोपाळजवळील हबिबगंज या रेल्वे स्थानकाचे नाव आता राणी कमलापती असं करण्यात आलं आहे. या दोन्ही घटनांना संघ परिवार प्रणित हिंदू तालिबानी प्रवृत्तीची दुसरी पायरी म्हटली पाहिजे. गेल्या सात वर्षात गोवंश हत्या थांबवून ग्रामीण भागातील एक अर्थचक्राला मोठ्या प्रमाणात खीळ घातली आहे. वासरू होऊ शकत नसलेल्या, दूध न देणार्या गायी म्हशींना आणि शेतीकामास अयोग्य ठरलेल्या बैलांना रेड्यांना केवळ शेण मुतासाठी पोसणं हे आर्थिकदृष्ट्या तोट्याचं आहे. देशातील कुठल्याही भागात अशा निरुपयोगी प्राण्यांना मारून त्यांचं मांस विकून आणि कातड्याचा उपयोग बॅग इ. वस्तू बनवण्यासाठी केला जातो. ज्या वि.दा. सावरकरांना संघ परिवार मानतो ते सावरकरसुद्धा गायीला माता म्हणणे किंवा गोहत्या बंदीच्या विरोधात होते. पण आज गोवा वगळता सर्व भाजपशासित राज्यात आज गोवंश हत्याबंदी आहे. गोव्यात मात्र संघ परिवाराच्या या तथाकथित मातेची हत्या सुरूच आहे. आणि ते योग्यच आहे. पण त्यावरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मुंबईत माता गोव्यात खाता’ अशी कॉमेंट केली. गोवंश हत्या बंदी, मांसाहाराच्या स्टॉल्स वर कारवाई करणे किंवा स्वच्छतेच्या आणि वासाच्या कारणास्तव दूर ठेवणे किंवा देशातील मुस्लिम नाव असलेल्या गावांची नाव बदलणे या सर्व कारवाया केवळ मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी होत असलेल्या कारवाया असून ही हिंदू तालिबानी प्रवृत्तीची दुसरी पायरी म्हटली पाहिजे. वास्तविक हिंदू देव देवतांनासुद्धा मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. नेपाळचे राजे ज्ञानेंद्र आणि त्यांची पत्नी भारतात येऊन कालिमातेची पूजा करून रेड्याचा बळी दिला होता. अमेरिकेतले मानववंशशास्त्रज्ञ बालमुरली नटराजन आणि भारतीय अर्थशास्त्रज्ञ सूरज जेकब यांनी केलेल्या संशोधनातून नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार सांस्कृतिक आणि राजकीय दबावामुळे देशातील शाकाहारी आकडेवारी ही फुगवून सांगितली जाते. त्यामुळे मांसाहारी व्यक्तींचा विशेषत: बीफ खाणार्यांचा आकडा शाकाहारी मंडळींच्या तुलनेत जाणीवपूर्वक कमीच सांगितला जातो. एकूण लोकसंख्येच्या जेमतेम 20 टक्के भारतीय पूर्ण शाकाहारी आहेत, असं स्पष्ट होतं. फुगवून सांगितल्या जाणार्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे.
एकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के नागरिक हिंदूधर्मीय आहेत आणि हीच मंडळी प्रामुख्याने मांसाहारी आहे. उच्चशिक्षित, उच्चवर्णीय भारतीयांपैकी केवळ एक तृतीयांश लोक शाकाहारी आहेत. म्हणजेच उर्वरित दोन तृतीयांश लोकांना, ज्यात हिंदूंसह सर्व धर्मियांचा आहे त्यांना सत्ताधीश असलेल्या एक तृतीयांश लोकांना जे अभिप्रेत आहे तेच आपल्या ताटात घेऊन खावं लागत. मुस्लिम महिलांच्या बुरखा पद्धतीवर टीका करणारे लोक स्वतः मात्र इतरांनी काय खावं यावर बंधनं आणतात आणि हा एक फार मोठा विरोधाभासच आहे. मानव प्राणी हा मूलतः सर्वभक्षी आहे. कारण मानवाचे पटाशीचे दात आणि दाढा हे शाकाहारी खाद्य खाण्यासाठी तर सुळे दात हे मांसाहारासाठी असतात. त्यातही भारतीय लोकांत घरी मांसाहार न करणार्या पण बाहेर यथेच्छ ताव मारणार्या लोकांचा जास्त समावेश आहे. रस्त्याच्या कडेला किंवा हॉकर झोनमध्ये मांसाहार विकणार्या स्वयंरोजगार व्यक्तींना स्वच्छतेच्या नावाखाली रोजगारापासून वंचित ठेवणं संपूर्णपणे अयोग्य आहे. जसं कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो तसा कोणी कोणता व्यवसाय करावा हाही व्यक्तिगत प्रश्न असतो. पण या दोन्ही ठिकाणी सरकारद्वारे अडसर आणून संघ परिवार आपल्या तथाकथित हिंदू तालिबानी पद्धतीचाच अवलंब करत आहेत.
अमीबा ते मनुष्य प्राणी ही उत्क्रांती होत रहाते. चार्ल्स डार्विन च्या म्हणण्यानुसार उत्क्रांती होते. आत्म्याचा विषय नाही. आणि मी आत्मा किंवा अध्यात्म हे शब्द मानत नाही. मला त्या विज्ञान पारंगत माणसांची कीव करावीशी वाटते. जे मृत्यूनंतर मृतात्म्यास शांती देवो असं म्हणतात. माझ्या दृष्टीने मानव नावाची एक रासायनिक प्रक्रिया संपलेली असते. पाप-पुण्य, चांगले-वाईट,शुभ-अशुभ असे काहीच नसते.
माजर जसे कोंबडे पकडून चावून चावून खाते तसे आज स्वत:ला मांसाहारी म्हणणारे खाऊ शकतील? कदाचित 9000-10000 वर्षांपूर्वी आपले पूर्वज तसे खातही असतील. अजूनही आदिवासी लोक काही ठिकाणी प्राणी पकडून खातात. डुकरे पकडून त्याना जिवंत भाजून खातात.( पहा- फँड्री ) म्हणजेच आपल्याला आता आपण नैसर्गिकरीत्या 100 % मांसाहारी आहोत असे म्हणणे योग्य होणार नाही.
तीच गोष्ट गावांची मुस्लिम नावं बदलण्याची. भारतात आजही दर सहा गावांमध्ये एक गावच नाव मुस्लिम समाजाशी जवळीक साधणार असतं. या नावात बदल करण्याची अनधिकृत प्रक्रिया सुरू केली अर्थात शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांनी. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी औरंगाबादच नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादच धाराशिव करू अशी घोषणा केली. भाजपला अशा महत्त्वाच्या घोषणा करायला नेहमी बाळासाहेबांचीच मदत लागली. 1986 सालच्या विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत ‘गर्वसे कहो हम हिंदू है’, ही घोषणा प्रथम त्यांनीच सुरू केली. तर बाबरी पडल्यानंतर, जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे हे म्हणणारे पण बाळासाहेबच होते. त्यांनीच औरंगाबाद, उस्मानाबादच नामांतर घोषित केलं. आणि त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असताना बॉम्बेच मुंबई झालं. त्यापाठोपाठ कलकत्ता, मद्रासच कोलकाता, चेन्नई झालं. दिल्लीच मात्र हस्तिनापूर किंवा इंद्रप्रस्थ झालं नाही. पण आता मुगलसराय, अलाहाबाद, हबिबगंज यांचं नामांतर दीनदयाल उपाध्याय नगर, प्रयागराज, राणी कमलापती करून एक नामांतराची लांबण लावली आहे आणि हे करताना जाणीवपूर्वक मुस्लिम नावाना टार्गेट करून तिथे हिंदू नावं आणून तिथे हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला जात आहे. तेही भारतातील प्रत्येक गावात सुमारे 20 टक्के मुस्लिम लोकसंख्या असताना.
इथे प्रश्न हा निर्माण होतो की नाव बदलल्याने इतिहास बदलला जातो का? दुसरा प्रश्न हा आहे की धर्मनिरपेक्ष पक्ष आपण सत्तेवर आल्यानंतर सर्व नावे बदलून मूळ नावे ठेवू, हे म्हणायला तयार आहेत का? ते यासाठी तशी घोषणा करणार नाहीत कारण त्यामुळे हिंदू मतदार अधिक दुरावेल असा त्यांना धोका वाटतो. याचा दुसरा अर्थ असाही होतो की, जर ते असे म्हणू शकत नसतील तर याचा अर्थ असा की बहुसंख्य मतदार सार्वजनिक जागेवरून मुस्लिम नावांचे सर्व संदर्भ काढून टाकण्याच्या बाजूने आहेत.किंवा ते ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका घेतात. जर भारताच्या इतिहासातील मुस्लिमांच्या भूमिकेचे सर्व संदर्भ खोडून टाकण्याच्या बाजूने असतील तर भारत खरोखरच धर्मनिरपेक्ष देश आहे का हा प्रश्न उद्भवतो. किंवा तो एक असा देश आहे की जिथे लोकांचा स्वभाव ऐतिहासिक तथ्ये ओळखून स्वीकारण्यास अनुकूल नाही . त्याचबरोबर संमिश्र संस्कृती स्वीकारण्याची आणि तीच जतन करण्याची इच्छा ही नाही. मग इतिहासकालीन वास्तूंची नाव बदलली जातील. संघ परिवाराशी संबंधित तथाकथित इतिहासकारांच्या मते ताजमहाल हे तेजोमहल नावाचं शंकराचं मंदिर तर कुतुबमिनार म्हणजे विष्णुस्तंभ! त्याचबरोबर महंमद बिन कासीम पासून बहादुरशहा जफरपर्यंत सर्व राज्यकर्त्यांनी केवळ अत्याचार केले. त्याचबरोबर सर्व मुस्लिम राज्यकर्ते हे परकीय! तुर्कस्तान, उझबेकिस्तान मधून आलेले. पण आज भारतातील 20 कोटी मुस्लिम लोकसंख्येपैकी बहुसंख्य इथलेच धर्मांतरित आहेत.
त्यामुळे भारतातील मुस्लिमांना परकीय म्हणून संबोधल जाणं हे सर्वस्वी चूक! मांसाहार बंदी, गावाची नावं बदलणं, इतिहास बदलण्याचा प्रयत्न त्याचबरोबर भारतात लोकप्रिय असलेले समोसा आणि गुलाब जामुन हे दोन खाद्यपदार्थ सुद्धा या मुस्लिम आक्रमकांच्या बरोबरच भारतात आले. मग आता त्यांच्यावरही परकीय पदार्थ म्हणून बंदी घातली जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचं आता आपल्या देशाचा नाव हिंदुस्थान ठेवणार की आर्यावर्त! आणि भारतीय राज्यघटनेच सेक्युलर स्वरूप कायम राहील आणि डॉ आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना कायम राहील की बदलली जाईल हाही सर्वात मोठा प्रश्न! तूर्तास इतकेच!