भास्कर खंडागळे
एका संशोधनानुसार, गर्भवती महिला दूषित हवेत श्वास घेते, तेव्हा हवेतील कण नाभीच्या माध्यमातून नवजात बालकापर्यंत पोहोचतात. याचा परिणाम गर्भाच्या आरोग्यावर होतो. इतकंच नाही, तर गुदमरणार्या हवेच्या संपर्कात असलेल्या मातेच्या शरीरात वाढणार्या गर्भाला किंवा बाळाला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. अशा गर्भात, बाळाच्या विकासावर परिणाम होतोच, तर काही वेळा ते गुदमरतं. या परिस्थितीवर मात कशी करणार?
‘नेचर कम्युनिकेशन’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, गर्भवती महिला दूषित हवेत श्वास घेते, तेव्हा हवेतील कण नाभीच्या माध्यमातून नवजात बालकापर्यंत पोहोचतात. याचा परिणाम गर्भाच्या आरोग्यावर होतो. इतकंच नाही, तर गुदमरणार्या हवेच्या संपर्कात असलेल्या मातेच्या शरीरात वाढणार्या गर्भाला किंवा बाळाला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. अशा गर्भात, बाळाच्या विकासावर परिणाम होतोच, तर काही वेळा ते गुदमरतं. ही परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे. वायू प्रदूषण हे प्रत्येकासाठी धोकादायक आहे. त्यामुळे अकाली जन्म, मिसकॅरेज, कमी वजनाचं बाळ जन्मणं आदी विकार आढळतात; पण शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच गर्भाशयात वाढणार्या मुलाच्या फुफ्फुसात आणि मेंदूमध्ये प्रदूषण आणि विषारी कण आढळून आले आहेत. हे कण आईकडून मुलापर्यंत पोहोचले आहेत. ‘लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनात नाळेमध्येही प्रदूषणाचे कण आढळून आले आहेत. स्कॉटलंड आणि बेल्जियममध्ये 7 ते 20 आठवड्यांमधल्या 36 गर्भांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी सांगितलं की, हा निष्कर्ष चिंताजनक आहे. एक घन मिलीलीटर ऊतींमध्ये काळ्या कार्बनचे हजारो कण आढळले आहेत. ते गर्भधारणेदरम्यान आईच्या श्वासोच्छवासातून रक्त आणि नाळेपर्यंत जातात, गर्भाच्या अवयवांपर्यंत पोहोचतात. हे कण वाहनं, घरं आणि कारखान्यांमधून निघणार्या धुराच्या काजळीपासून तयार होतात. यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते.
या अभ्यासात सहभागी असलेले अॅबरडीन विद्यापीठातील प्रोफेसर पॉल फॉलर म्हणतात की, गर्भधारणेच्या पहिल्या आणि दुसर्या तिमाहीमध्ये काळ्या कार्बनचे नॅनो कण प्लेसेंटा ओलांडून अवयवांमध्ये प्रवेश करत असल्याचं प्रथमच दिसून आलं आहे. फॉलर यांच्या मते, चिंताजनक गोष्ट म्हणजे ते विकसनशील मेंदूकडेदेखील स्थलांतरित होतात. संशोधन सह-नेते प्रोफेसर टिम नवरोट म्हणतात की मानवी विकासाच्या सर्वात संवेदनशील टप्प्यावर विचार करणं आणि योग्य पोषण मिळवणं महत्वाचं आहे. प्रदूषणाचे परिणाम आयुष्यभर टिकतात. जगातली 90 टक्के लोकसंख्या अशा ठिकाणी राहते, जिथे वायू प्रदूषण प्रमाणापेक्षा जास्त आहे. ताज्या अभ्यासातून दिसून आलं आहे की गर्भात असलेल्या मुलाच्या मेंदूवर विषारी कणांचा परिणाम होतो. याचा परिणाम मुलाच्या संपूर्ण आयुष्यावर होण्याची भीती आहे. संशोधनात समाविष्ट असलेल्या देशांमध्ये 2010 मध्ये 23.1 लाख, 2019 मध्ये 19.3 लाख आणि 2015 मध्ये 20.9 लाख बालकांचा जन्मापूर्वी मृत्यू झाला. हवेतील पीएम 2.5 प्रदूषित कण जन्माला येण्याआधीच प्राण गमावलेल्या बालकांपैकी साडेनऊ लाख बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले.
जगातील प्रत्येक भागात वायू प्रदूषण वाढलं आहे. हवेत विरघळणारे विष मानवांसाठीच नाही, तर पृथ्वीवरील प्रत्येक जीवासाठी धोकादायक बनले आहे. भारतातील महानगरांमध्ये आढळणार्या गुदमरुन टाकणार्या हवेमुळे नवजात आणि वाढणारी मुलेही अनेक आरोग्यसमस्यांना बळी पडत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने 2021 मध्ये केलेल्या संशोधनानुसार, दूषित हवा हे जगभरात दर वर्षी बळी पडणार्या 8.30 लाख नवजात बालकांच्या अकाली मृत्यूमागील मुख्य कारण आहे. वास्तविक, वाढत्या वायू प्रदूषणाचा जीवनाशी निगडीत प्रत्येक भागावर परिणाम होत आहे. हृदयविकार, श्वसनाचे आजार आणि कर्करोगाशी प्रदूषित हवेचा जवळचा संबंध आहे. हवेत विरघळणारं विष प्रत्येक वयोगटातल्या लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे हवेतील हानिकारक पदार्थ. हवेतील प्रदूषित कणांच्या वाढीमुळे मुलांच्या नैसर्गिक विकासावरही परिणाम होतो. त्यामुळे जन्मापासूनच मुलांमध्ये शारीरिक-मानसिक विकृती निर्माण होतात. एवढेच नाही तर, हवेत विष विरघळल्याने दुषित हवा शरीरात जाऊन महिलांमधील गर्भपाताचे प्रमाणही वाढले आहे. हवेची गुणवत्ता, गर्भवती स्त्री आणि नवजात बालकांचे आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’, ‘पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’, ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ या अभ्यासातील आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की, पाच वर्षाखालील मुलांमध्ये वायू प्रदूषण हे एक महत्त्वाचं कारण आहे.
विशेष म्हणजे श्वसनाचे आजार आणि न्यूमोनिया हे आजही भारतातल्या बालकांच्या मृत्यूमागील सर्वात मोठे कारण आहे. मुलांचे अत्यंत संवेदनशील अवयव अतिप्रदूषणाचा प्रभाव सहन करू शकत नाहीत. त्यामुळे ते अनेक आजारांना लवकर बळी पडतात. आजच्या बदलत्या जीवनशैलीत प्रदूषण फक्त बाहेरूनच नाही, तर घराच्या आतही वाढले आहे. दोन्ही ठिकाणी त्रास देणारे वायूप्रदूषण गरोदर आणि नवजात बालकांसाठी जीवघेणे ठरत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये परिस्थिती आणखी बिघडते. राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणामुळे शाळा बंद झाल्याच्या आणि मुलांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये अचानक वाढ झाल्याच्या बातम्या दर वर्षी येत असतात. बदलत्या सामाजिक-कौटुंबिक परिस्थितीचाही गर्भात वाढणार्या मुलांच्या स्थितीशी आणि प्रदूषणाशी संबंध आहे. ‘नेचर कम्युनिकेशन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की, प्रदूषित हवा जास्त वयाच्या महिलेच्या पोटात वाढणार्या बाळासाठी अधिक धोकादायक ठरत आहे. नवीन पिढीच्या हितासाठी हवा आणि पाण्याची स्वच्छता हा विषय आपल्या अग्रक्रमात असायला हवा होता; पण दुषित हवेमुळे त्यांचा जीव धोक्यात येत आहे, हे खेदजनक आहे. भारतातच नाही, तर जगभरातील विकासवेगापुढे जीवनाशी संबंधित मानकांकडे दुर्लक्ष केल्याने जीवन विस्कळीत होत आहे.
विकासाला गती देण्यासाठी दळणवळण, वाहतूक आणि उद्योग हे घटक आवश्यक असले तरी नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी हवा आणि संपूर्ण वातावरण स्वच्छ ठेवणे विशेष महत्त्वाचे आहे.
अंदाधुंद जंगलतोडीपासून रस्त्यावर वाढत्या वाहनांच्या संख्येपर्यंत आणि सोयी-समृद्ध जीवनशैलीमुळे विकसनशील देशांमधल्या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. प्रत्येक वयोगटात आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. विशेष म्हणजे भारतात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी लाखो लोकांचा जीव जातो. विषारी घटकांमुळे आज मोठी लोकसंख्या दमा, हृदयविकार, कर्करोग, त्वचाविकार आदींनी ग्रस्त आहे. आपल्या देशाने हवेच्या गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी आपलं लक्ष्य सुधारलं तर 660 दशलक्ष लोकांचं आयुर्मान 3.2 वर्षांनी वाढेल. अशा परिस्थितीत वयाची मोजणी सुरू होण्याआधीच निरपराधांचे प्राण हिरावून घेतले जात असतील तर ते भीषण परिस्थिती सूचित करते. प्रदूषित हवेमुळे भावी पिढ्या एक तर गर्भातच जीव गमावत आहेत किंवा आजार घेऊन जगात येत आहेत, ही खेदाची बाब आहे. ‘युनिसेफ’च्या ‘द क्लायमेट क्रायसिस इज अ चाइल्ड राइट्स क्रायसिस – इंट्रोड्युसिंग द चिल्ड्रन्स क्लायमेट रिस्क इंडेक्स’ या अहवालात मुलांवर लक्ष केंद्रित करून अशा अनेक धोक्यांचा इशारा दिला होता. या अहवालानुसार हवामानबदलामुळे नव्या पिढीचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षेला गंभीर धोका आहे. भारतात बालपणातील संसर्गाचा उच्च धोका आहे. एवढेच नाही तर प्रदूषणामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेवरही परिणाम होत आहे.
हे स्पष्ट आहे की, वाढत्या आरोग्य समस्या, शाळा बंद करणे आणि प्रदूषित हवेमुळे होणारे आजार हे गंभीर धोक्याचे लक्षण ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्योग आणि वाढत्या वाहनांमधून घरगुती कामासाठी उत्सर्जित होणारे विषारी वायू कमी करण्यासाठी ठोस आणि व्यावहारिक उपाय शोधणे आवश्यक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने असेही म्हटले आहे की वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी भारतामध्ये किफायतशीर मार्गांमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. जीवनशैलीत बदल करून सुविधा गोळा करण्याऐवजी सर्वसामान्यांनीही मुलांना स्वच्छ वातावरण देण्याचा विचार करण्याचीगरज आहे.
तसेच, प्रशासकीय आघाडीवर दोषारोप करण्याऐवजी गुदमरणार्या हवेतून सुटका करण्याचा मार्ग शोधला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा विकास मानवी जीवनापेक्षा जास्त महत्वाचा नाही, हे इथे हे समजून घेणे महत्वाचे आहे.