वृत्तगौरव पुरस्काराने ‌‘कृषीवल’चा सन्मान

| रायगड | प्रतिनिधी |

कला फाऊंडेशनच्या तप पूर्ती सोहळ्याप्रसंगी जनसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या ‌‘दैनिक कृषीवल’ वृत्तपत्राचा वृत्तगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, पीएनपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांच्या हस्ते दैनिक कृषिवलच्या संपादिका माधवी सावंत यांनी हा सन्मान स्वीकारला.

1 / 6

कला विश्व फाऊंडेशनच्या तप वर्ष पूर्ती सोहळ्यानिमित्त मंगळवारी (दि.14) काव्य स्पर्धा, बक्षीस वितरण व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काव्य स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांनी आपल्या कविता सादर केल्या. त्याला उपस्थित प्रेषकांनी उदंड साद दिली. त्याचबरोबर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वृत्तगौरव पुरस्कार ‌‘दैनिक कृषीवल’, कला चेतना पुरस्कार जयवंत गायकवाड व तैसीम चाफेकर, काव्यरत्न पुरस्कार सुचिता बागडे-खाडे व प्रतीक्षा थळे, कला गौरव पुरस्कार किरण साष्टे, गौरांगी पाटील व योगेश पवार, सागररत्न पुरस्कार अंबर नाखवा आणि क्रीडा रत्न पुरस्कार सृष्टी पाटील यांना मान्यवर अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान, कला विश्व फाऊंडेशनचे संस्थापक प्रणित म्हात्रे यांनी प्रास्ताविकात फाऊंडेशनच्या गेल्या बारा वर्षातील प्रगतीचा धावता आलेख मांडला. तसेच, फाऊंडेशनचा भविष्यातील नियोजनात्मक आराखडा देखील उपस्थितांसमोर मांडला. सामाजिक वैषम्यता दूर करणे प्रत्येक सुजाण नागरिकांची जबाबदारी आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणांना सहकार्य केले तर आपण चांगला समाज घडवू शकू, असे आवाहन प्रणित म्हात्रे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रा.जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, दैनिक कृषीवलच्या संपादिका माधवी सावंत, पीएनपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, देवेंद्र केळुस्कर, गजानन पाटील, विपुल पाटील, सन्मान पाटील, ॲड. प्रमोद पाटील, पराग पाटील, हर्षल म्हात्रे, मनस्वी म्हात्रे, विनायक देशपांडे, दीप पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version