पनवेल तहसीलवर श्रमजिवी संघटनेची धडक

। पनवेल । वार्ताहर ।
आदिवासी बांधवाच्या विविध मागण्यांसाठी श्रमजिवी संघटना, महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालयावर धडक दिली आहे. या मोचात संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक, कुंदा पवार, बाळू वाघे, बाबुराव शिंदे, राम नाईक, शेतकरी प्रमुख भगवान वाघमारे, कचरु कातकरी, सुमन नाईक, बाबुराव लेंडे, पंढरीनाथ कातकरी, संतोष वाघे, अरुण वाघमारे, तुळशीराम जाधव, बळीराम कातकरी, आनंदी कातकरी आदींसह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होवून सुद्धा अजूनही मुलभूत सोयी सुविधांपासून आदिवासी बांधव वंचित आहेत. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी वाड्यांना रस्ते नाही आहे, वीज पुरवठा नाही आहे, अनेक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ आहे तसेच कित्येक ठिकाणी रेशन धान्य सुद्धा देण्यात येत नाही किंवा देण्यात येणारे रेशन सुद्धा कमी प्रमाणात असते. विविध घरकूल योजना, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी त्याचप्रमाणे शासकीय योजनांचा फायदा या आदिवासी बांधवांना अद्यापपर्यंत मिळाला नाही.
या मोर्चाद्वारे शासनाने आदिवासींच्या मुलभूत प्रश्‍नांकडे लक्ष घालून या सर्व योजना आदिवासी बांधवांना देण्यात याव्यात व त्यांना मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवू नये यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भातील निवेदन त्यांनी पनवेल तहसील कार्यालयाला दिले आहे.

Exit mobile version