| रत्नागिरी | प्रतिनिधी |
जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊनही जिल्हा शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार काही सुधारण्याचे नाव घेईना. येथे भूलतज्ज्ञ नसल्याने अनेक शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत. तसेच, एका गर्भवती महिलेला आपले बाळ गमवावे लागले असून तिची प्रकृती गंभीर आहे. याचप्रमाणे अन्य रुग्णांची सुद्धा फरफट होत आहे.
सर्वसामान्यांचे रुग्णालय म्हणून जिल्हा रुग्णालयाची ओळखल आहे. हे रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी करोडो रूपये खर्ची करण्यात आले असून अनेक सुसज्ज विभाग आहेत. परंतु, यासाठी लागणारे मनुष्यबळच नसल्याने हे सर्व कुचकामी ठरत आहे. तसेच, जिल्हा रुग्णालयात वर्ग एकच्या तज्ज्ञ डॉक्टरांची 80 टक्केच्या वर पदे रिक्त आहेत. वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची परिस्थिती तीच आहे. भूलतज्ज्ञाची अनेक वर्षांपासून मागणी आहे; परंतु शासनाला आणि प्रशासनाला एक भूलतज्ज्ञ उपलब्ध करून देता आलेला नाही. याचा मोठा फटका एका कुटुंबाला बसला आहे. या कुटुंबातील एका महिलेचे सीझर करायचे होते. बाळ पोटातच दगावल्यामुळे ऑपरेशन होणे आवश्यक होते. परंतु, भूलतज्ज्ञ नसल्याने वेळेत ऑपरेशन झाले नाही आणि आता त्या महिलेची प्रकृती गंभीर आहे.