वावोशी फाट्यावर बस थांबा, स्वच्छतागृहांचा अभाव

प्रवासी, चाकरमान्यांची गैरसोय

| वावोशी | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे वावोशी गाव आणि आजचा वावोशी फाटा हा परिसरातील सर्वात गजबजलेला बाजारपेठेचा भाग बनला आहे. मात्र इतक्या मोठ्या बाजारपेठेत आजही बस थांबा व सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे प्रवासी व चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

पूर्वापार वावोशी गाव हे छत्तीशी विभागातील बाजारपेठेसाठी प्रसिद्ध होते. छत्तीशी विभागातील भात दळण्याचे मुख्य केंद्र वावोशी येथे असल्याने परिसरातील सर्व शेतकरी येथे येत असत. यामुळे भात खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आणि किराणा, कपड्यांची दुकाने, दागिने, हॉटेल्स अशी मोठी बाजारपेठ येथे विकसित झाली. कालांतराने पेणखोपोली मार्गावरील वावोशी फाटा येथे दळणवळण सुलभ झाल्याने बाजारपेठेचे केंद्र फाट्यावर स्थलांतरित झाले.

माध्यमिक शाळा, दवाखाने, बँका, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे तसेच जांभिवली, शिरवली, होराळे परिसरातील औद्योगिक कारखाने यामुळे या ठिकाणी व्यापारी वर्दळ लक्षणीय वाढली. आज येथे किराणा, कपडे, दागिने, हॉटेल्स, दूध डेअरी, मटण शॉप, भाजी दुकाने, जनरल स्टोअर्स, मिठाई दुकाने अशा असंख्य दुकाने असल्याने या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसते. वावोशी फाटा हा पेण व खोपोलीकडे जाण्यासाठी मुख्य नाका असल्याने सर्व जलद एसटी गाड्या देखील येथे थांबतात. तसेच खाजगी वाहनेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या गजबजलेल्या ठिकाणी प्रवाशांसाठी कोणताही अधिकृत बस थांबा उपलब्ध नाही. तसेच बसण्याची किंवा निवाऱ्याची सुविधा नसल्याने उन्हाळा, पावसाळा व थंडीमध्ये प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहावे लागते. विशेष म्हणजे इतकी मोठी बाजारपेठ, शासकीय कार्यालये व बँका असूनही येथे एकही सार्वजनिक स्वच्छतागृहही उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांची, विशेषतः महिलांची मोठी घुसमट होत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे सुमारे 30 ते 35 वर्षांपूर्वी वावोशी फाट्यावर एसटी बस थांबा अस्तित्वात होता. त्या ठिकाणी पेण व खोपोलीकडे जाणाऱ्या एसटी बसेसचे वेळापत्रकही लावलेले असायचे. मात्र आज हा बस थांबा पूर्णपणे नामशेष झाल्याचे चित्र आहे.

गोरठण बुद्रुक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?
सध्या वावोशी फाटा हा गोरठण बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. ग्रामपंचायतीकडून येथील दुकाने व मालमत्तांवर नियमित कर वसुली केली जाते. मात्र इतक्या महत्त्वाच्या बाजारपेठेत बस थांबा व सार्वजनिक स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे तातडीने येथे बस थांबा व स्वच्छतागृह उभारावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.
Exit mobile version