अपूर्ण निवारा शेड; प्रवाशांचे हाल
| सुतारवाडी | प्रतिनिधी |
रोहा रेल्वे स्टेशनमधून दररोज 50 रेल्वेच्या गाड्या धावत असतात. बाहेरून येणाऱ्या दिल्ली-गुजरात-तिरुअनंतपुरम-गोवा या मार्गाकडे सातत्याने रेल्वेच्या गाड्यांना सातत्याने मोठे प्रवासी मिळत असतात. या ठिकाणी दोन प्लॅटफॉर्म आहेत. प्लॅटफॉर्म नंबर एक व प्लॅटफॉर्म नंबर दोन. मात्र दोन्ही प्लॅटफॉर्मला अपूर्ण निवारा शेड आहेत. मुख्य म्हणजे या दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये इंडिकेटरची व्यवस्था नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांना गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे येण्याअगोदर मोठी धावपळ करावी लागते. विशेषता ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अचानकपणे जाणे शक्य होत नाही.
या रेल्वे स्टेशनला अनेकवेळा जीएम आणि डीजीएम भेटी देत असतात. मात्र त्यांना प्रवाशांचे हाल दिसत नाहीत. दोन्ही प्लॅटफॉर्मला पूर्णपणे निवाराशीर नसल्यामुळे हजारो प्रवाशांना उन्हाळी व पावसाळी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यातून उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर मिळत असते. मात्र प्रवाशांच्या सुविधांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर दोन्ही प्लॅटफॉर्मला पूर्ण निवारा शेड, त्याचप्रमाणे इंडिकेटरची व्यवस्था करावी, अशी मागणी हजारो प्रवासी सातत्याने करत आहेत. मात्र त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी भेडसावणाऱ्या विविध सुविधा लवकरच उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे.







