ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनंतर प्रकार उघडकीस
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कॅशलेस प्रवासासाठी सुरू करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड योजनेत श्रीवर्धन बसस्थानकात गैरप्रकार समोर आला आहे. शासकीय नियमानुसार 199 रुपये शुल्क असलेल्या स्मार्ट कार्डसाठी ‘एबिक्स कॅश’ या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून प्रवाशांकडे 250 रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत भगत यांनी याबाबत आगारप्रमुख महिबूब मणेर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
कार्डासाठी अतिरिक्त 50 रुपये देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने ‘केंद्र बंद करतो, तक्रार करायची असेल तर करा,’ अशा शब्दांत प्रवाशांशी हुज्जत घातल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे बसस्थानकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच आगारप्रमुख महिबूब मणेर यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित कर्मचाऱ्याची कानउघाडणी केली. तसेच कार्डासाठी 200 रुपयांपेक्षा अधिक रक्कम आकारू नये, अशा सूचना दिल्या. मात्र, यापूर्वीही या केंद्रावर सर्वच प्रवाशांकडून 250 रुपये घेतल्याचे समोर आले असून, काही प्रवाशांना केवळ 200 रुपयांची पावती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अतिरिक्त घेतलेले 50 रुपये परत करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. कार्ड मिळविण्यासाठी रांगेत तासनतास उभे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना या प्रकाराचा फटका बसत आहे. एसटी प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
कार्डासाठी अडीचशे रुपये देण्यास आम्ही नकार दिल्यानंतर केंद्रावरील कर्मचाऱ्याने ‘मी शटर खाली करतोय, तुम्हाला काय करायचे असेल ते करा,’ अशी धमकी दिली आणि केंद्र बंद केले. यावेळी आगारप्रमुखांनी मध्यस्थी केली. मात्र, कार्डासाठी नेमके किती शुल्क आहे, याचे अधिकृत परिपत्रक केंद्रावर स्पष्टपणे लावण्यात यावे.
चंद्रकांत भगत,
ज्येष्ठ नागरिक, श्रीवर्धन







