महामार्गाच्या चौपदरीकरणात नियोजनाचा अभाव

प्रवाशांची रखडपट्टी

। संगमेश्‍वर । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्‍वर येथील सोनवी पूल परिसरात चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतो. चारचाकी वाहनांबरोबच अवजड वाहनेही ये-जा करीत असल्याने कोंडीतून सुटका होण्यासाठी एक ते दोन तास लागतात. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांना ठरलेल्या वेळेत नियोजित ठिकाणी पोहोचणे अवघड होत आहे. सध्या उन्हाळी सुट्टयांमुळे चाकरमान्यांसह पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळल्याने वाहतुकीत भर पडली आहे. वाहतूक पोलिसांसह ठेकेदाराकडून योग्य नियोजन होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईच्या दिशेने जाताना संगमेश्‍वर येथील विश्रामगृहाच्या वळणापासून वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात होते ती अगदी पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या एका पुलापर्यंत सुरू राहते. कासवगतीने वाहन चालविण्याचा अनुभव या परिसरात चालकांना येत आहे. शनिवार, रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर वाहनांची प्रचंड गर्दी असते. दरम्यान एखादी रुग्णवाहिका आली तर मोठी पंचाईतच होते. त्या रुग्णवाहिकेला जागा मोकळी करून देण्यासाठी वाहन चालकांची तारांबळ उडते. अनेक बेशिस्त चालक रिकामी जागा मिळेल तिथे गाडया उभ्या करतात. या बेशिस्त वाहन चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संगमेश्‍वर शास्त्राी पुलाजवळ ठेकेदाराकडूनही तजवीज करणे आवश्यक आहे. मात्र, वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करत असून त्यांच्या अनियोजित कारभारामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Exit mobile version