मनोज जरांगेंचे टीकास्त्र
| जालना | वृत्तसंस्था |
लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना म्हणजे सरकारचा मत मिळवण्याचा डाव आहे, अशी टीका मराठा नेते मनोज जरांगे यांनी केली. जरांगेंनी आंतरवाली सराटीतून शनिवारपासून सरकारविरोधात पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.
ते म्हणाले, तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचे नाही. धनगरांना आरक्षण द्यायचे नाही. मुस्लिमांना द्यायचे नाही. तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही. आता लाडका भाऊ, लाडकी बहीण योजना आणली आहे. तुम्हाला आम्हा सर्वांना येड्यात काढायचं आहे का? आता लाडकी मेहुणा किंवा मेहुणी योजना आणतील. तुम्हाला हेच करायचं आहे का? असा सवाल जरांगेंनी केला आहे. तुम्हाला असले लफडे करायचे आहेत का? निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटायचे, निवडणुका संपल्या ही हे सर्व बंद पडणार. लोकांना रांगेत उभे केले जात आहे. रांगेत उभे केल्यानं काय होतं तुम्हाला माहिती आहे ना. गोरगरिबांना लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकारने लाडकी योजना आणली. सरकार चांगलं आहे. त्यामुळे ते लढा विसरतात. या नादात रांग लागल्यामुळे तिथे लाडकी बहीण गेली, भाऊ गेला अन् आता लाडका भाऊदेखील जाईल, असं जरांगे म्हणालेत.
लाडकी बहीण योजनेमुळे साईट बंद पडल्यात. आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाहीये. सरकार बधिर झालं आहे का? लाडकी बहीण योजनेमुळे साईटवर लोड आलाय. मेहुणीचे भरायचे की मेहुण्याचे फॉर्म भरायचे. सरकारने हा डाव टाकला आहे. बारा बलुतेदारांनी समजून घ्या. लाडकी बहीण योजनेमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत. गर्दी झाल्यामुळे साईटच बंद झाली आहे, असा दावा जरांगेंनी केला आहे.
सरकारने विद्यार्थ्यांचे वाटोळं केलं. सरकारनं चांगलंच काम केलं असेल, माझा त्याला विरोध नाही. पण, पैसे दिले म्हणजे एकप्रकारचे तुम्ही मतदार विकत घेतले आहेत. एका खासदारानेदेखील अशी आयडिया केली होती. मी नाव सांगणार नाही. ती महिला होती. साडी आणि मंगळसूत्र वाटायला सुरुवात केली होती. पण, निवडणुकीत तिचा पराभव झाला. लोकांनी शहाणे व्हावं, हे लोक खूप चालू आहेत, असं जरांगे म्हणाले