| पनवेल | वार्ताहर |
पनवेल येथील प्राचीन श्री विरूपाक्ष महादेव मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्याला 21 वर्षे पूर्ण झाली. जीर्णोद्धाराच्या 21 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पनवेलमधील पत्रकार बांधव आणि विविध मंदिरांच्या न्यासाचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लक्ष पुष्प अर्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता. देवस्थान विश्वस्त व सेवा समूह यांच्यावतीने परमोच्च प्रसन्नतेची अनुभूती देणारा हा सोहळा न भूतो न भविष्यती असा पार पडला.
सकाळी मान्यवरांच्या हस्ते शंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर गाभाऱ्यामध्ये 12 विविध प्रकारची पुष्पे अर्पण करून लक्ष पुष्प अर्चन सोहळा पार पडला. प्रसाद कर्वे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शंभू महादेवाचे नाम उच्चारण झाल्यावर अर्चन सोहळ्यासाठी बसलेले मान्यवर पुष्पाणी समर्पयामी असे म्हणत फुले अर्पण करत होते. विशेष म्हणजे, विरुपाक्ष महादेव मंदिराच्या इतिहासात हा सोहळा पहिल्यांदाच पार पडला.
या सोहळ्यानंतर विविध रंगीय सुवासिक फुलांनी गाभारागृह भरून गेले. हजारो भाविकांनी त्यानंतर मनोभावे दर्शन घेतले. दुपारी शंभू महादेवांना नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर नांदेड येथील गायक अभिषेक काळे यांच्या स्वरसोहम या सुश्राव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विरूपाक्ष महादेव मंदिरात लक्ष पुष्प अर्चन सोहळा
