सोने-चांदीसह डायमंड दागिन्यांनाही पसंती; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
| पनवेल | प्रतिनिधी |
दिवाळीचा उत्साह, लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त आणि सोन्याच्या दरात झालेली घसरण या तिहेरी योगामुळे पनवेल, अलिबागमधील सराफ बाजार रविवारी ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला. सकाळपासूनच सोने-चांदी खरेदीसाठी नागरिकांनी सराफांच्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. सोन्याची नाणी, आकर्षक दागिने, चांदीच्या वस्तूंपासून डायमंड ज्वेलरीपर्यंत विविध प्रकारच्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती मिळाली. विशेष म्हणजे, सोन्याचे दर कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी नियोजित खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सराफ बाजारात चांगली उलाढाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भारतीय संस्कृतीत दिवाळी आणि सोने-चांदी खरेदीचे नाते जुने आहे. धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपूजनापर्यंत मौल्यवान धातूंच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात सोने-चांदी आणणे शुभ मानले जाते. याच श्रद्धेतून अनेक कुटुंबांनी खरेदीचे नियोजन केले होते. काहींनी गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याची नाणी घेतली, तर काहींनी पत्नी, मुले आणि कुटुंबियांसाठी दागिन्यांची खरेदी केली.
यंदाच्या खरेदीत पारंपरिक दागिन्यांसोबत आधुनिक डिझाइनलाही पसंती मिळाली. महिलांनी नेकलेस, बांगड्या, अंगठ्या, कानातील दागिने अशा विविध प्रकारांची निवड केली. तर तरुणाईमध्ये डायमंड ज्वेलरीचे आकर्षण दिसून आले. काही ग्राहकांनी चांदीची नाणी, लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती आणि पूजेसाठी आवश्यक असलेल्या चांदीच्या वस्तू खरेदी केल्या. पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक आवड यांचा सुंदर मिलाफ सराफ बाजारात पाहायला मिळाला.
गेल्या काही दिवसांतील सोन्याच्या दरातील चढ-उताराने ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. 6 नोव्हेंबरच्या तुलनेत 7 नोव्हेंबरला सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. त्यामुळे खरेदीसाठी ही संधी असल्याचे मानून अनेक ग्राहकांनी दिवाळीचा मुहूर्त साधला. 8 नोव्हेंबरला दरात किरकोळ वाढ झाली असली, तरी आधीच्या घसरणीमुळे बाजारात खरेदीचा उत्साह कायम होता.
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर पनवेलच्या सराफ बाजारात दिसलेली गर्दी ही केवळ दागिन्यांच्या खरेदीपुरती मर्यादित नव्हती, तर परंपरा, गुंतवणूक आणि सणाचा आनंद यांचा संगम होती. महागाई आणि वाढत्या सोन्याच्या किमतींचे आव्हान असतानाही आपल्या ऐपतीनुसार सोने-चांदी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. दिवाळीच्या रोषणाईत सराफ बाजारातील सोन्याची झळाळीही विशेष लक्षवेधी ठरली.
सोन्याचे आजचे दर
24 कॅरेट सोने : 1,43,180 रुपये प्रति 10 ग्रॅम.
22 कॅरेट सोने : 1,31,670 रुपये प्रति 10 ग्रॅम.
चांदी : 1,91,000 रुपये प्रति किलो.
डायमंड ज्वेलरीकडेही तरुणाईचा कल
सोन्या-चांदीच्या पारंपरिक दागिन्यांसोबत डायमंड ज्वेलरीलाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. आकर्षक डिझाइन, नवनवीन प्रकार आणि आधुनिक फॅशन यामुळे तरुण महिला तसेच जोडप्यांकडून डायमंड दागिन्यांची खरेदी केली जात असल्याचे चित्र सराफ बाजारात पाहायला मिळाले.
प्रशांत म्हात्रे,
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने खरेदीला सकाळपासूनच गर्दी केली होती. सोन्याची नाणी घेण्याकडे ग्राहकांचा जास्त कल दिसून आला. तसेच आजचा मुहूर्त साधण्यासाठी आधीपासून अनेकांनी दागिन्यांची बुकिंग केली होती. एकंदरीत आपल्या ऐपतीनुसार सोने खरेदी केली आहे.
शाखा व्यवस्थापक, वामन हरी पेठे ज्वेलर्स, अलिबाग






