| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव येथील ललित सखाराम कदम याने राज्यस्तरीय महा स्विम चॅम्पियनशिप 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा प्रबोधिनीमध्ये 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील विविध वयोगटातील जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. रोहा येथील जे. एम. राठी विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या ललितने फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक आणि बाय फिन प्रकारांमध्ये भाग घेत चार सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले. या यशामुळे त्याने आपल्या गटात चॅम्पियनशिपही जिंकली. ललितच्या या यशामागे प्रशिक्षक भूषण शिर्के, भूषण म्हात्रे व निखिल शिंदे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. विद्यालयाचे प्रशासनही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असून, भविष्यात रायगड जिल्ह्याचे नाव अधिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ललितची जलतरणात चार सुवर्ण
