पोलादपूरमध्ये सर्व्हिसरोडवर लालमातीचे ढिगारे

| पोलादपूर | प्रतिनिधी|

पोलादपूरमध्ये पश्चिमेकडील सर्व्हिसरोडवर लालमातीचे ढिगारे कोसळत असून तेथेदेखील पूर्वेकडील सर्व्हिसरोडप्रमाणे काँक्रीटची संरक्षक भिंत उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. एस.टी.स्थानकाच्या कंपाऊंडच्या जाळीपासून 45 मीटरचे भुसंपादन करण्यात आल्यानंतर रस्ता दुभाजकासाठी तसेच फूटपाथसाठी जागा व्यापली जाऊ नये, यासाठी अंडरपास महामार्ग नेताना केवळ पाऊण फूट रूंदीचे रस्ता दुभाजक अंडरपास महामार्गातून नेण्यात आले आहेत. पूर्वेकडील सर्व्हिसरोडवर साधारणपणे एक मीटर रूंदीचे फूटपाथ आणि अंडरग्राऊंड गटाराचे बांधकाम करण्यात आले असताना पश्चिमेकडील सर्व्हिसरोडला मात्र काही ठिकाणी अडीच फूट उंच आणि एक मीटर रूंद तर काही ठिकाणी केवळ एक फूट उंच आणि दीड फूट रूंदीचे फूटपाथ व अंडरग्राऊंड गटार बांधण्यात आली आहेत.

विद्यामंदिर पोलादपूरच्या जुन्या इमारतीलगतच्या डोंगरातून लालमातीचे ढिगारे कोसळू नयेत यासाठी आधीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुमारे 25 फूट उंचीची तसेच 40 मीटर लांबीची काँक्रीटची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. यामुळे याठिकाणाहून सर्व्हिसरोडवर लालमातीचे ढिगारे कोसळण्याची शक्यता कायमचीच नष्ट झाली असून या भिंतीच्या समोरील पश्चिमेकडील सर्व्हिसरोडवर मात्र लालमातीचे ढिगारे कोसळण्यास सुरूवात होऊनही याठिकाणच्या भुसंपादित व्यक्तींचे चोचले पुरविण्याचे काम मएलऍण्डटीफ या ठेकेदार कंपनीकडून होत नसल्याने अर्धवट तोडण्यात आलेल्या इमारतींखालील जमिनीतून लालमातीचा ढिगारा कोसळून पश्चिमेकडील सर्व्हिसरोडवर आल्याचे दिसून येत आहे.

पोलादपूर शहराची मूळरचना चौपदरीकरणामुळे पूर्वेकडील मूळ पोलादपूर आणि पश्चिमेकडील नव्याने विस्तारित होणारे पोलादपूर अशी दुभागली गेली असून पश्चिमेकडील लोकवस्तीसाठी आता त्याभागातच किराणा मालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, ज्वेलर्स आणि सलून तसेच औषधाची दुकाने, डॉक्टर तसेच वाहन दुरूस्तीची दुकाने, हॉटेल्स, कॉम्प्युटरसंस्था, रयत शिक्षण संस्थेची ग्रामदेवस्थानाजवळील शाळा अशा प्रकारचा विकास घडून आला आहे. त्यामुळे पश्चिमेकडील सर्व्हिसरोडवरून आबालवृध्दांसह वाहनांचीही वर्दळ सुरू आहे. त्यामुळे भविष्यात घाटे आवाडाच्या श्रीसाईमंदिराजवळील लालमातीचे ढिगारे कोसळणाऱ्या या भागात कोणतीही दूर्घटना न होण्यासाठी काँक्रीटची संरक्षक भिंत उभारून लालमातीचे ढिगारे कोसळण्यास प्रतिबंध करण्याची आवश्यकता दिसून येत आहे.

Exit mobile version