भोगाव ‘डेंजर झोन’मध्येही दरडीचा धोका कायम; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात चोळई गावानजीक दगड-मातीची दरड कोसळल्याने प्रशासनाकडून खबरदारी म्हणून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. घाटातील हॉटेल अन्नपूर्णा ते चोळई दरम्यान सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ही वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील भोगाव हद्दीतील ‘डेंजर झोन’मध्येही दरडी कोसळण्याचा धोका कायम असून प्रवासी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जय भारत ठेकेदार कंपनीकडून नियोजित रस्त्याच्या कामाच्या वरच्या बाजूने तात्पुरता खडीकरणाचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, या भागातही मोठे दगड रस्त्यावर येत असल्याने वाहतूक धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान कशेडी घाटातील डोंगराचा मोठा भाग उभा कापण्यात आला आहे. त्यामुळे चोळई परिसरात दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. मंगळवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी सकाळपासून डोंगर भागातील लाल मातीचे ढिगारे आणि दगड रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली.
भोगाव हद्दीतील जुन्या महामार्गावरील खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असली तरी या भागात मोठमोठे दगड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोंगरातून मातीचे ढिगारे कोसळू नयेत यासाठी गॅबियन नेटवर्कचे काम करण्यात आले आहे. मात्र, या भागात कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरडीचा मोठा भाग कोसळल्यास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळा सुरू होऊनही ‘डेंजर झोन’मधील खचलेल्या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
