प्रशसनाकडून शेतकर्यांना प्रोत्साहन
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
टिकाऊ, लागवडीचा अल्प खर्च, कमी मशागत, कमी वेळात अधिक उत्पादन व उत्पन्न देणार्या बांबूच्या लागवडीकडे अनेकजण वळत आहेत. बांधकाम व्यवसाय, मांडव उभारणी, विविध वस्तुनिर्मिती, शोभेसाठी आणि गुढीपाडव्यासाठी बांबूला मागणी वाढली आहे. याशिवाय पनवेल व मुंबई सारखी मोठी बाजारपेठ जवळ असल्याने ठिकठिकाणी शास्त्रशुद्धरित्या बांबू लागवड होत आहे. याबरोबरच प्रशसनाकडून देखील शेतकर्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे.
पालीतील रवींद्र लिमये यांनी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली आहे. गुढीपाडव्यानिमित्त बांबू विक्री देखील सुरू आहे. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील शेतकरी तुषार केळकर हे बांबूपासून इको फ्रेंडली घरे तयार करतात आणि याचे प्रशिक्षण देखील देतात. त्याचबरोबर सुधागड तालुक्यातील गोंदाव माठळ येथील शहा यांनी आपल्या शेतामध्ये बांबूची लागवड केली आहे.
सुधागड तालुक्यातील ढोकशेत येथे सचिन सुर्यकांत टेके व प्रतीक्षा सचिन टेके यांनी साडेचार एकर क्षेत्रामध्ये ‘बांबूविश्व’ उभारले आहे. बांबू लागवड करून शेतकर्यांसमोर आदर्श निर्माण केलेला आहे. त्यांच्या ‘बांबूविश्व’ या बांबू बनात एकूण 1 हजार 300 हून अधिक बांबूची लागवड केलेली आहे. त्यात मुख्यत्वे माणगा ही प्रजाती व इतर 34 अनेकविध प्रजातींचे बांबू आहेत. जिल्ह्यातील इतरही शेतकर्यांनी बांबू लागवडीकडे वळावे यासाठी ते निःशुल्क बांबू लागवड परिसंवाद आयोजित करत असतात.
चांगला भाव व बाजारपेठ
सचिन टेके यांनी सांगितले की, पनवेल व मंबई मार्केटमध्ये चांगल्या काठीला 70 ते 80 रुपये दर मिळतो. लागवडीनंतर चार वर्षांनी बांबू तोड करावी. लागवडीच्या वर्षी खर्च जास्त येतो. त्यामध्ये रोपांचे पैसे, रोपांसाठी खड्डे खोदणे, तण काढणे व रोपे लावणे या सर्व कामासाठी मजुरी व खतांचे पैसे यांचा समावेश आहे. दुसर्या वर्षापासून केवळ तण काढण्यासाठी मजुरी आणि खते यासाठी खर्च येतो. ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत बांबूना पाणी द्यावे.
बांबूसाठी कमीत कमी देखभालीची आवश्यकता लागते. तसेच, अवेळी पाऊस, वादळ यात नुकसान होत नाही. बांबू पीक हे फळ पिकांसारखे नाशवंत नसल्याने व्यापार्यांकडून गळचेपी होत नाही. कोकणातील स्थानिक भरीव बांबू माणगा जातीला मुंबईजवळील बांबू मार्केटमध्ये फार दीर्घकाळापासून चांगली मागणी आहे. बांबूलागवडीतून बांबू विकून वर्षा आड जास्तीत जास्त एकरी 3 लाख 50 हजार रुपये नफा मिळू शकतो.
सचिन टेके,
संस्थापक, बांबूविश्व