| रायगड | प्रतिनिधी |
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला आणि गोळीबार केल्याच्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून रायगड जिल्हा देखील याला अपवाद राहिला नाही. रविवारी रायगड जिल्ह्यात रोहा, खालापूर, नेरळ आणि पेण येथे मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून मोर्चा काढला. काही ठिकाणी व्यापारी वर्गाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून दुकाने बंद ठेवली होती. या आंदोलनाचा मोठा फटका हा राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. जिल्ह्यातील आगारातून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात जाणाऱ्या बस रद्द झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.
पेणमध्ये मराठा समाजाचा तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चा
जालना जिल्हयात अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधनिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालून लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आज रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मराठा समाजाच्या माध्यमातून पेण शहरातून तहसिल कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांना तशाप्रकरचे निवेदन दिले. या निषेध मोर्चामध्ये शेकडो मराठा समाजाचे मावळे सहभागी झाले होते, त्याचप्रमाणे मोर्चामध्ये उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने देखील सहभाग दर्शविला होता.
आज झालेल्या या निषेध मोर्चाने एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असो, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी पेण शहर निनादून सोडले होते. यावेळी बोलताना मराठा समाजाचे नेते मंगेश दळवी यांनी झालेल्या हल्ल्याचा निषेध करत ज्यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले त्यांचा सुद्धा निषेध केला आणि यापुढे अशीच भूमिका शासनाची असेल तर पुढील आंदोलने गनिमी काव्याने होतील आणि त्यातून आम्ही शासनाला गुढग्यावर बसविल्या शिवाय राहणार नाही असे सांगितले. या आंदोलनात मराठा समाजाचे नेते मंगेश दळवी आणि सामजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांच्यासह जिल्हा समन्वयक विनोद साबळे, लहू पाटील, अविनाश पाटील, शिरीष मानकावळे, सुनील सत्वे, राजेंद्र वारकर, जगदीश ठाकूर, रुपेश कदम, मेघना चव्हाण, छाया क्काईनर आदी आंदोलक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
मराठा समाजाच्या ‘बंद’च्या हाकेला रोह्यात प्रतिसाद
जालना येथे उपोषणास बसलेल्या मराठा समाज बांधवांनावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आज मराठा समाजाच्यावतीने रोहा बाजारपेठ बंदची हाक दिली होती. या हाकेला व्यापारी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बहुतांश व्यापारी बांधवांनी आपली दुकानें बंद करून मराठा समाजच्या बंदला जाहीर पाठिंबा दर्शविला.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला. व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करून रक्तबंबाळ केले हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल असे आवाहन रोह्यात सकल मराठा समाज बांधवांनी केले. या नंतर आज रविवारी सकाळी 10 ते 12 वा. पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी केले. या आवाहानाला व्यापारी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र रोहा बंदच्या दरम्यान बाजार पेठेत सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळाला.
खालापुरात सकल मराठा समाज रस्त्यावर
समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयाबाहेर राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत सनदशील मार्गाने आंदोलन शुक्रवार दि.2 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. त्यानंतर तहसिलदार आयुब तांबोली यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. खालापूर नगरपंचायतीच्या प्रारंगणातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर तहसिल कार्यालय पर्यत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकल मराठा समाजाचे प्रमुख नेते, माजी नगराध्यक्ष डॉ.सुनिल पाटील, जि.प.माजी सभापती नरेश पाटील, शिवसेनेचे सुरेश कडव, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, युवासेना अधिकारी महेश पाटील, शेकापक्षचे खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे, उत्तम भोईर, प्रशांत खांडेकर, भाऊ सणस, शशिकांत मोरे, धनश्री दिवाणे, सुखदा बने, किशोरी सिंगवण, अदिती पवार, संगिता पाटील, कविता पाटील, रेश्मा रासकर, योगिनी कदम यांच्यासह मराठा समाजातील नेते, महिला आणि तरूणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यकर्त्यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष डॉ.सुनिल पाटील यांनी दिली आहे.
कळंबमध्ये मराठ्यांचा मोर्चा; कारवाईची मागणी
सराटी येथील मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेला हल्ला या प्रकरणाचे पडसाद कर्जत तालुक्यात उमटले आहेत. मराठा समाजातर्फे कळंब येथे निषेध मोर्चा काढण्यात आला, यावेळी सरकारचा निषेध करत दोषींवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्या घटनेचा मराठा समाजाच्या वतीने जागोजागी निषेध केला जात आहे. कर्जत तालुक्यातील कळंब परीसरातील मराठा समाजाच्या शेकडो तरुणांनी एकत्र येत या अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील तरुणांची गर्दी जमली होत्या. त्यामुळे नेरळ पोलिसांनी मोठी कुमक बंदोबस्त करण्यासाठी मागविली होती. मराठा समाजाच्या उपोषण कर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली.
जालना घटना अफवांवर विश्वास ठेवू नका
घटने संदर्भात कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नये असे जाहीर आवाहन नागरिकांना माणगाव पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. महाराष्ट्र पोलिस सदैव जनतेच्या पाठीशी असून, काही समाज कंटक सदरच्या घटनेला वेगळे वळण देत आहेत. कोणीही गैरकायद्याची मंडळी जमविणे, जाळपोळ करणे, रास्तारोको करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे हे दखलपात्र व गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. सोशल मीडियावर आमची सायबर सेल टीम लक्ष ठेवून आहे तरी कोणतीही कृती करतांना आपण आपला व कुटुंबीयांचा विचार करावा असे आवाहन सर्व नागरिकांना माणगाव पोलीस ठाण्यातर्फे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.