टाटा रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा

वाहन कालव्यात, सुदैवाने प्रवासी बचावले

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील भालीवडी टाटा रोड रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण अशी कामे सुरू आहेत. त्या रस्त्याच्या बाजूने कालवा जात असून, त्या ठिकाणी त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथून जाणारे चारचाकी वाहन थेट नाल्यात कोसळले आणि त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून गाडीमधील प्रवासी वाचले आहेत.

कर्जत-मुरबाड रस्त्यावरून टाटा कंपनीकडे जाणार्‍या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण आदी कामे सुरू आहेत. त्या रस्त्याच्या बाजूला राजनाला कालवा जात असून, सध्या तेथील नाल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणत्याही प्रकारची माहिती वाहनचालकांना दिलेली नाही. त्यामुळे (दि.29) मार्च रोजी रात्रीच्या वेळी प्रवास करताना एक चार चाकी वाहन कोणताही अंदाज न आल्यामुळे नाल्यात कोसळले. तसेच रस्त्याच्या येथे कोणताही संरक्षक फलक लावला न गेल्यामुळे एक चारचाकी वाहन नाल्यात पडता पडता राहिले. स्थानिकांनी वेळीच मदत केल्याने सर्व प्रवाशांचे प्राण वाचू शकले.

पनवेलवरून भालीवडीला कार्यक्रमाकरिता प्रवास करणारे अशोक पवार आणि त्यांच्या पत्नी, सासू, सासरे चारचाकी इको फोर्ड वाहनाद्वारे जात होते. टाटा रोडचे काम सुरु असल्याने जुने भवानी माता मंदिरच्या मागून नाल्याला लागून रस्ता बनविला जात आहे.त्या वळणावर पनवेलवरून आलेले हे प्रवासी वळण रस्त्यावर नाल्याच्या किनार्‍याला संरक्षण भिंत नसल्याने समोरून येणारे वाहन त्याची लाईट डोळ्यावर आल्याने समोरचा रस्ता अरुंद असल्याने (सूचना फलक नसल्याने) सदर वाहन नाल्याच्या उतारावर जाऊन हॅन्ड ब्रेक लावून चालकाने गाडी थांबवली. गाडीच्या काचा बंद असल्याने गाडी कळंडलेल्या स्थितीत असताना प्रवासी बाहेर येऊ शकत नव्हते. त्यावेळी सदर ठिकाणावरून प्रवास करणारे चोचीची वाडी गावचे योगेश देशमुख यांनी त्वरित शेजारुन जाणार्‍या गाडीला मदतीसाठी आवाज दिला. त्यावेळी चेतन पवाळी आणि त्यांचे मित्र यांनी गाडी थांबवत चालकाच्या मदतीने दरवाजे उघडून प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली.

दरम्यान, काम चालू असताना ठेकेदार आणि अभियंता यांनी बॅरिकेट्स व सूचना फलक न लावल्याने त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार काल घडला. या झालेल्या प्रकाराला जबाबदार कोण? अशा निष्काळजी करणार्‍या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे आणि अभियंता यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सदर वाहन चालक करीत आहेत.

Exit mobile version