विकासाच्या गोंधळात वडगावकरांची फरपट; पावसाळ्यापूर्वी मार्ग खुला करण्याची मागणी
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे वडगाव गावाकडे जाणारा प्रमुख संपर्क रस्ता बंद झाल्याने संपूर्ण गावच जणू अडचणीत सापडले आहे. विकासाच्या नावाखाली गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाची मोठी फरपट होत असून, पावसाळा तोंडावर असताना नागरिकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे हा मार्ग तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, अशी तीव्र मागणी वडगाव ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
याबाबत वडगाव ग्रामपंचायतीने संबंधित विभागांना लेखी निवेदन देऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत. या मागणीची गंभीर दखल घेत मंत्री भरत गोगावले, प्रांताधिकारी, गोरेगाव पोलीस ठाणे, तसेच साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर आणि रेपोली येथील शासकीय कृषी रोपवाटिकेनेही हा रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
वडगाव हे सामाजिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव मानले जाते. गावातील विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार, नोकरदार वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक दररोज या मार्गाचा वापर करतात. मात्र, महामार्गाच्या कामादरम्यान गावाच्या मुख्य प्रवेशमार्गाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भार नागरिकांवर पडत आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ वडगाव गावाचा नसून संपूर्ण परिसराच्या विकासाशी आणि जनजीवनाशी निगडित असल्याचे स्पष्ट होत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, विकासकामांना कोणाचाही विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होणे अस्वीकार्य आहे. महामार्गाचे काम करताना स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे.
महामार्ग विकासाच्या नावाखाली गावकऱ्यांच्या रोजच्या आयुष्याचा बळी का दिला जात आहे? विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांचे आरोग्य, शेतकऱ्यांचा रोजगार आणि नागरिकांची सुरक्षितता यापेक्षा कोणतेही काम मोठे असू शकत नाही. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता खुला झाला नाही, तर हजारो नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सध्या वडगावकरांची नजर प्रशासनाच्या निर्णयाकडे लागली असून, विकासाच्या गोंधळात अडकलेल्या या गावाला दिलासा देण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांचे हाल
रस्ता बंद झाल्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना बसत आहे. शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज अतिरिक्त अंतर कापावे लागत आहे. तर आजारी रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचणे कठीण बनले आहे. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेत पोहोचेल की नाही, याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
शेतकरी आणि मजूर वर्गालाही मोठा फटका बसत आहे. शेतमाल वाहतूक, शेतीची कामे आणि दैनंदिन रोजगारासाठी नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत असल्याने आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. काही नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करताना उन्हात, पावसात आणि अंधारात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
वाहतूकीचा महत्त्वाचा मार्ग
माणगाव आणि गोरेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास वाहने वडगाव, वडघर, कुरवडे आणि गोरेगाव मार्गे म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव व महाडकडे वळवली जातात. त्यामुळे हा मार्ग केवळ गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे.
कृषी रोपवाटिकेलाही फटका
रेपोली येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाला भेट देणारे पर्यटक तसेच शासकीय कृषी रोपवाटिकेकडे ये-जा करणारे शेतकरी आणि वाहने मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. रस्ता बंद झाल्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या संस्थांपर्यंत पोहोचण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत.







