गणेशभक्तांचा प्रवास बनला धोकादायक; उपाययोजना करण्याच्या बाता निष्फळच!
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात असलेल्या भुयारी मार्गामध्ये पाण्याची गळती अद्याप सुरू आहे. या भुयाराचे काम पूर्ण झाल्यापासून छताच्या बाजूच्या कातळातून होणाऱ्या पाण्याची गळती रोखण्यासाठी आयआयटी मुंबईच्या सल्ल्यानुसार उपायोजना करण्याच्या बाता निष्फळ ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अगामी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास धोकादायक बनला आहे. दरम्यान, या भुयारी मार्गाच्या पोटठेकेदारांकडून लवकरच दोन्ही भुयारी मार्ग गळती मुक्त करण्याची ग्वाही देण्यात आली आहे.
कशेडी घाटातील 6 लेन असलेल्या दुहेरी भुयारी मार्ग आणि जोडरस्त्यांच्या एकूण बांधकामासाठी सुमारे 502 कोटी खर्च मंजूरी निश्चित करण्यात आली होती. या कामाचे टेंडर रिलायन्स इन्फ्रा प्रोजेक्टने शिंदे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट लिमिटेड (एसडीपीएल) या पोटठेकेदाराला दिले. त्यानंतर 2019 मध्ये पोटठेकेदारामार्फत भुयारी मार्गाचे खोदकाम सुरू केले. या भुयारी मार्गाचे काम 2021 मध्ये पूर्ण झाल्यावर भुयारात काही अंतरावर छताकडील कातळातून भुगर्भातील पाण्याची भुयारी मार्गात वाहनांवर गळती सुरू झाली. त्यामुळे छताकडील कातळामध्ये भुगर्भातील पाण्याचा मोठा साठा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बारमाही भुयारी मार्गात गळती सुरू असताना पावसाळ्यात गळतीचे प्रमाण अधिक असते. भुयाराच्या छतावरून आणि भिंतींवरून पाण्याचे मोठे फवारे उडत असल्याचे गेल्या वर्षीपर्यंत पाहायला मिळाले. त्यामुळे भुयाराच्या आतील रस्ता निसरडा झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यावर आयआयटी मुंबईच्या सल्ल्यानुसार उपायोजना करण्याच्या चर्चा पोटठेकेदारांकडून करण्यात येऊन मलमपट्टी करण्यास सुरुवात केली. अंतर्गत भागातील खडकाचा दाब आणि पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी शॉटक्रिटसह पीव्हीसी मेम्ब्रेन आणि फायबर शीटचे अस्तर बसवण्यात आले. त्यामुळे भुयारी मार्गातील तीन पदरी रस्त्याच्या दूतर्फा बांधलेल्या गटारांमध्ये छताच्या खडकातील गळणारे पाणी वळविण्यात आले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून गळती रोखण्यासाठी करण्यात आलेले सर्व उपाय निष्फळ ठरले असून, दोन्ही भुयारी मार्गांमधील गळती सद्यस्थितीतही सुरूच आहे. त्यामुळे दोन्ही भुयारातील रस्ते निसरडे होऊन अपघात होऊ शकेल इतपत धोका अद्याप कायम आहे.
काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे काही दिवसांनी गणोशात्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि गणेश भक्तांची लगबग वाढणार आहे. सद्यस्थितीत कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात हवा खेळती राहण्यासाठी आधुनिक व्हेन्टीलेशन सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच, हाय-टेक एलईडी पथदीप आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी 11 केव्ही वीज पुरवठ्यासह जनरेटर बॅकअप देखील ठेवण्यात आले आहे. दोन्ही भुयारी मार्गाला अंतर्गत जोडणारे आपत्कालीन रस्ते आहेत. मात्र, गळतीची नेमकी कारणे शोधण्यासाठी आणि योग्य तांत्रिक तोडगा काढण्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांची मदत घेऊन दोन्ही भुयारी मार्गांचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, तरीही गळती सुरुच राहिल्याने आगामी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या व कोकणातून येणाऱ्या वाहनांना निसरड्या रस्त्याच्या धोक्यालाही सामोरे जावे लागेल, हे निश्चित आहे. याखेरीज, दोन्ही भुयारी मार्गाच्या जोड रस्त्यावर बाजुच्या डोंगरातून लाल मातीचे ढिगारे आणि दरडी कोसळण्याच्या धोकाही गेल्या वर्षभरात वाढला आहे.
मार्ग गळती मुक्त करण्याची ग्वाही
शिंदे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट लिमिटेडचे अमोल शिवतारे यांनी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी गळतीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करीत लवकरच दोन्ही भुयारी मार्ग गळती मुक्त करण्याची ग्वाही ‘कृषीवल’च्या प्रतिनिधीस बोलताना दिली. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी आणि अमोल माडकर यांनी एसडीपीएलचे अमोल शिवतारे यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा दिला. परिणामी, कशेडी घाटातील भुयारी मार्गातील यंदाच्या गणेशोत्सवातील वाहतूक गणपतीबाप्पा निर्विघ्नपणे पार पाडेल, एवढीच प्रार्थना करणे चाकरमानी आणि गणेशभक्तांच्या हाती आहे.
