| वेनगाव | वार्ताहर |
सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ शेडुंग-पनवेल या कॉलेजच्या वतीने कायदा जनजागृती मोहिमेचे आयोजन दि. 28 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. सामान्य माणसांना कायद्याबद्दल माहिती व्हावी प्रत्येकाच्या जीवनात दैनंदिन जीवन जगत असताना कायद्याचे ज्ञान किती महत्त्वाचे आहे याबद्दल जागरूकता व्हावी म्हणून शेडुंग गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेडूंग गावातील ग्रामस्थांना ॲड. ललित पगारे यांनी कार्यक्रमाचे प्रयोजन व महत्त्व समजावून सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 व कायदा सेवा, अधिकारी कायदा, याबद्दल प्रा. ॲड. पूनम मानकवळे यांनी ग्रामस्थांना माहिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी घरोघरी ग्रामस्थांना प्रत्यक्षात भेटून आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनिंग कार्ड, जातीचा दाखला, अल्पसंख्याक दाखला, डोमेसिल दाखला इ. महत्त्वाची कागदपत्रे प्राप्त करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. अशी कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी अर्ज कसा करायचा, कोठे करायचा व आपल्या अर्जाची दखल घेत नसल्यास काय कार्यवाही करावी करावी लागेल, याविषयी माहिती देण्यात आली.
पैसे नसतानाही आपण कोर्टात न्याय कसा मागू शकतो कायद्यामध्ये त्यासाठी काय तरतुदी आहेत, हेही समजावून सांगितले. विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉमध्ये विनामूल्य लीगल सर्विस ऑथॉरिटी कशा प्रकारे चालवल्या जातात याविषयी ग्रामस्थांना माहिती दिली व या सर्विसचा लाभ घेण्यासाठी आवाहनही केले. प्रा. ॲड. प्रियांका मुरकुटे यांनी प्रत्यक्ष ग्रामस्थांची भेट घेऊन माहिती दिली. यावेळी प्रा. डॉ. मृत्युंजय पांडे, उपप्राचार्य डॉ. मारूफ बाशीर, शिक्षक ॲड. ललित पगारे व सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष विधी शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. शेडुंग गावचे रामदास खेत्री, दर्शना दुर्गे, अनिता खेत्री, विठ्ठल दुर्गे, प्रकाश खेत्री, भगीरथ पाटील, ग्रामस्थ व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.