गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश अभूतपूर्व आहे. यापूर्वी काँग्रेसच्या माधवसिंह सोळंकी यांनी 149 जागा जिंकल्या होत्या. आता भाजप त्याच्याही पुढे निघून गेला आहे. 1995 पासून, शंकरसिंग वाघेलांच्या बंडाचा थोडा अपवाद वगळता भाजप सतत तिथं राज्यावर आहे. 2017 मध्ये काँग्रेसने चांगली टक्कर देत 77 जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी भाजपला काठावरचे का होईना बहुमत मिळाले होते. तेव्हा हार्दिक पटेल आणि आरक्षण मागणारा पटेल समाज काँग्रेसच्या सोबत होता. मधल्या काळात भाजपने काँग्रेसचे अनेक आमदार फोडले आणि हार्दिक पटेल यांनाही आपल्याकडे खेचून घेतले. त्यानंतर काँग्रेसने या निवडणुकांमधून जवळपास अंग काढून घेतले. सर्व लक्ष भारत जोडो यात्रेवर केंद्रीत केले गेले. राहुल गांधी यांनी अगदी नाईलाजाने शेवटी दोन सभा घेतल्या. काँग्रेसकडे या राज्यात किमान तीस टक्के हुकुमी मते आहेत. पण पक्षाने त्यांची कदर केली नाही. आम आदमी पक्षासाठी ही अत्यंत अनुकूल स्थिती ठरली. त्याचा त्याने पुरेपूर फायदा उठवला. काँग्रेसला मत देऊन ते वाया घालवू नका हा अरविंद केजरीवाल यांचा प्रचार प्रभावी ठरला. दिल्ली आणि पंजाबपाठोपाठ आम आदमी पक्षाची ही मुसंडी लक्षवेधी आहे. महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी निवडणूक चिन्ह गोठवले तर शिवसेनेची काय हालत होईल अशी चर्चा चालू होती. त्या पार्श्वभूमीवर पक्ष नवीन, चिन्ह अपरिचित आणि प्रदेश प्रतिकूल असूनही आपने हे जे यश मिळवले आहे. त्यापासून शिवसेना आणि अन्य पक्षांनी शिकण्यासारखे आहे. आपने हिंदू मतांना चुचकारण्यासाठी भाजपच्या वरताण प्रचार केला आणि बिल्कीस बानोसारख्या महत्वाच्या मुद्यांना बगल दिली हे खरेच आहे. पण दुसरीकडे त्या पक्षाने आरोग्य, शिक्षण व अन्य क्षेत्रांमध्ये गुजरातची हालत किती खराब आहे हेही जगासमोर आणले. भाजपला या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. आपने विरोधी मतांमध्ये फूट घडवून आणल्यामुळे भाजपला इतके प्रचंड यश मिळाले आहे असेही एक विश्लेषण करता येईल. पण यालाही काँग्रेस व अन्य राजकीय विरोधक जबाबदार आहेत हे लक्षात ठेवायला हवे. दुसरीकडे भाजपचा विजय एकतर्फी व सहज वाटत असला तरी ते खरे नाही. गेले दोन महिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सुमारे एकतीस सभा घेतल्या. तीन मोठे रोड शो केले. अमित शहा हेही गुजरातेतच मुक्काम ठोकून होते. याखेरीज केंद्रातले जवळपास अठरा मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री यांनाही प्रचारासाठी जुंपण्यात आले. या सर्वांना अक्षरशः गल्लीबोळात आणि घरोघर फिरवण्यात आले. प्रचारासाठी पैसा किती वाहिला याची गणतीच नाही. याखेरीज ‘आप’ला दिल्लीत गुंतवून ठेवण्यासाठी नेमक्या त्याच वेळी महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यात पराभव होणार आहे हे ठाऊक असूनही गुजरातसाठी तिथल्या सत्तेचा बळी देण्यात आला. मोदींच्या गृहराज्यातील विधानसभेसाठी इतकी ताकद लावावी लागावी हे पुरेसे बोलके आहे. त्यामुळे भाजपचे यश डोळे दिपवणारे असले तरी त्यामागची सर्वच कहाणी गोजिरी नाही. हिमाचल प्रदेशात झालेली पीछेहाट हे त्याचे आणखी एक उदाहरण आहे. आपने तिथेही काँग्रेसच्या मार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पण त्याची डाळ शिजली नाही. अर्थात तेथे प्रत्यक्ष सरकार स्थापन होईपर्यंत काहीही बोलणे घाईचे ठरेल. गेल्या वर्षभरात बंगाल आणि पंजाब या दोन प्रांतात मोदी आणि भाजप यांची जादू चालली नव्हती. त्यामुळे गुजरात या गृहराज्यात विक्रमी यश मिळवणे मोदींसाठी अनिवार्य होते. ते साधले आहे. पण सतत पंचवीस वर्षे सत्तेत असूनही भाजपला स्वतःच्या कामांच्या आधारे नव्हे तर मोदींच्या नावानेच मते मागावी लागतात ही या विजयाची दुसरी बाजू आहे. हिमाचलमध्ये तर उमेदवार कोण आहे त्याचा विचार करू नका मला मत देताय असं समजा असं आवाहन खुद्द मोदी करीत होते. त्यामुळे भाजप आज कितीही बलाढ्य भासत असला तरी त्याच्या कमकुवत जागाही बर्याच आहेत. विरोधकांनी त्या ओळखायला हव्यात. तशी डावपेचांची आखणी करायला हवी.