। पनवेल । वार्ताहर ।
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात हृदयविकारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेकदा हृदयाचा झटका इतक्या वेगात येतो की त्यात मृत्यू ओढवतो. मात्र, या अशा प्रसंगात हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत जर काही प्राथमिक उपचार मिळाले तर काहीवेळा प्राण वाचण्यास मदत होते. अशावेळी हृदयरोगावर गेमचेंजर ठरलेला उपाय म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन. या उपायाने अनेकांचे प्राण वाचले आहेत.जागतिक हृदय दिनानिमित्त, मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी खारघर तसेच पनवेल रेल्वेस्थानकावर कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशनचे एक तासाचे प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. यामध्ये नागरिकांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात आले.
डॉ. अभिजित सावंत यांच्या नेतृत्वाखालील या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले असून खारघर, पनवेल सारख्या विविध स्थानकांवर जिथे शेकडो नागरिक प्रवास करतात अशा ठिकाणी सीपीआर तंत्राविषयी माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. भारतात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे, ज्याचा परिणाम केवळ प्रौढावरच नाही तर तरुणांवरही होत आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, आनुवंशिकता, धूम्रपानाची वाईट सवय, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि ताण-तणाव, अति व्यायाम, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, मद्यपान, चरबीयुक्त पदार्थांचे सेवन यासारखे अनेक घटक हृदयरोगास कारणीभूत ठरतात. तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका, अचानक हृदयविकाराचा झटका येणे, हृदयविकाराचा झटका येणे यासारख्या घटनांमध्ये होणारी चिंताजनक वाढ असून हे एक चिंतेचे कारण ठरत आहे. मुंबईची ‘लाइफ लाईन’ म्हणून ओळखल्या जाणार्या लोकल ट्रेनवरने दिवसाला लाखो लोकं प्रवास करतात हे ओळखून नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्सने रेल्वे स्थानकांवर प्रशिक्षण सत्र आयोजित केले.
हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान केले जाणारे सीपीआर हे जगण्याची शक्यता वाढवते. सर्वसामान्य नागरिकांना ‘सीपीआर’ येणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी, गोल्डन अवरमध्ये उपचार आवश्यक आहेत. गोल्डन अवर म्हणजे हृदयाचा झटका आल्यानंतर तत्काळ जे प्रथमोचार ज्या वेळेत रुग्णांना मिळतात त्या वेळेला गोल्डन अवर म्हणतात. अनेक व्यक्तींना या वेळेत सीपीआर दिल्यामुळे रुग्ण बचावल्याच्या अनेक घटनांची नोंद हृदयरोगतज्ज्ञांकडे आहे.