। आपटा । वार्ताहर ।
आपटा गाव ते खारपाडा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनांना धोकादायक आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला साईटपट्टी नसल्यामुळे अवजड वाहन आले तर दुचाकीस्वारांना व इतर वाहनांना रस्त्याखाली उतरावे लागते. त्यामुळे एका बाजूला खड्डे तर दुसर्या बाजूला पाताळगंगा नदीचे पात्र असल्यामुळे अपघात घडत आहेत. यातच भर म्हणून रस्त्याच्या कडेला गवत व झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत आणि हा रस्ता उंच-खोल व ठिकठिकाणी वळणे असल्यामुळे धोकादायक आहे.
नुकतेच या रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र खबरदारी घेतली गेली नाही. नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कित्येकदा पावसाळ्यात हा रस्ता जलमय झाल्यामुळे बंद होतो. त्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत. या रस्त्यावर ज्या ठिकाणी पाणी साचते असते, अशा ठिकाणी रस्ते उंच करण्याची गरज आहे.
लोणा कंपनीच्या शेजारी नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे हा रस्ता बंद होतो, तर पुढे रेल्वे पुलाजवळ पुलाखाली पाणी साचल्यामुळे रस्ता बंद होतो. ज्या ठिकाणी रस्ता खाली आहे, त्या ठिकाणी रस्ता उंच करण्याची गरज आहे. कारण नदीचे पात्र लगतच असल्यामुळे नदीचे पाणी रस्त्यावर येते. यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच नदीच्या पात्रात बांधकामे केली असल्यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे पाणी रस्त्यावर येते. नदीच्या पात्राशेजारी बांधकामे होणार नाहीत याची दखल सार्वजनिक बांधकाम खात्याने घेऊन रस्ता तयार करावा, अशी मागणी होत आहे.