नगरपालिकेकडून स्वच्छतेचा सपाटा

अधिकाऱ्यांची जागेवर जाऊन पहाणी

| माथेरान | वार्ताहर |

माथेरान हे जागतिक पर्यटनस्थळ म्हणून बिरुदावली असलेले शहर असून रायगड जिल्ह्यातील गिरीशिखरावरील वसलेले असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. फिरत असताना पाण्याची बॉटल, प्लास्टिक पॅकेट मधील खाद्यान्न घेतात. खाद्यान्नखाऊन झाल्यानंतर बॉटल आणि रॅपर जंगलामध्ये फेकतात परिणामी जंगलात फार मोठ्या प्रमाणात कचरा साठत होता. तर याचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जंगल स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. स्वच्छता झाले की नाही हे येथील अधिकारी वर्ग स्वतः जागेवर जाऊन पाहाणी करीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी या जंगलातील कचऱ्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे व कर्जत तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने येथील तहसीलदार तथा अधीक्षक दिक्षांत देशपांडे यांनी पॉईंट परिसरातील दुकानदार व नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेऊन स्वच्छतेविषयी हातात हात घालून काम करण्याचे आवाहन करत नगरपालिका कर्मचारी वर्गाला सूचना केल्या. त्यानुसार माथेरानच्या विविध भागात नगरपालिका कर्मचारी कामाला लागल्याचे चित्र आहे.

अधिकारी वर्ग स्वतः जागेवर जाऊन संपूर्ण परिसराची पाहाणी करीत आहे त्यात तहसीलदार तथा अधीक्षक दिक्षांत देशपांडे, माथेरान वन विभागाचे वनक्षेत्रपाल उमेश जंगम आणि तसेच माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी जागेवर जाऊन पहाणी करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी हार्ट पॉईंटच्या परिसरात जाऊन पाहाणी करून दुकानदारांना सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शारलोट तलाव परिसरातील पाहाणी केली. तसेच आत्ता वन ट्री हिल परिसरात पण पाहाणी करणार आहेत. या जंगलात कचरा टाकू नका प्रत्येक पॉइंटवर कचरा कुंडी आहे त्यात हा कचरा टाका जंगलात कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर सीआरपीसी 133 अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्यामुळे कचरा इतरत्र न करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी केले आहे.

Exit mobile version