| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव येथील द.ग. तटकरे महाविद्यालातील ग्रंथालय विभागाच्यावतीने दि.13 ते 19 ऑगस्ट या कालावधीत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्रंथालय परिचय कार्यक्रम’ उत्साहात पार पडला. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.आर. पांडेय, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र आचार्य यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसचे, या कार्यक्रमाचे आयोजन ग्रथंपाल डॉ. संगिता उतेकर यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील बी.ए., बी.कॉम., बी.एससी., बी.एससी.आय.टी., बी.एम.एस. आणि बी.ए.एफ. या सर्व शाखांमधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची रचना, वेळापत्रक, नियमावली तसेच ग्रंथालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सेवा व सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील संदर्भग्रंथ, पाठ्यपुस्तके, कथा, कादंबऱ्या, नाटके, काव्यसंग्रह, आध्यात्मिक पुस्तके, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, वर्तमानपत्रे, नियतकालिके, जर्नल्स, बुक बँक, सी.डी., विश्वकोश, शब्दकोश, प्रकल्प साहित्य, प्रश्नपत्रिका, अभ्यासक्रम, वर्तमानपत्रांची कात्रणे, बाँड व्हॉल्यूम, ई-बुक्स व ई-जर्नल्स इत्यादी वाचनसाहित्याची माहिती देण्यात आली. महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील उपलब्ध वाचनसाहित्य, सेवा-सुविधा आणि त्यांचा शैक्षणिक उपयोग याबाबत योग्य माहिती मिळावी तसेच विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा नियमित, प्रभावी आणि जास्तीत जास्त उपयोग करून आपल्या ज्ञानात भर घालावी, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
ग्रंथालय परिचय कार्यक्रम उत्साहात
