वर्ल्डकप पात्रता फेरी आजपासून
| ब्यूनस एअर्स | वृत्तसंस्था |
दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा अर्जेंटिनाच्या सेवेसाठी दाखल झाला आहे. 2026 मध्ये होत असलेल्या फुटबॉल विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीला उद्यापासून सुरुवात होत आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ घरच्या मैदानावर होणार असलेल्या लढतीत इक्वेडोरशी दोन हात करणार आहे.
मागील वर्षी (2022) विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत फ्रान्सला हरवून अर्जेंटिनाने 1986 नंतर विजेतेपदावर मोहोर उमटवली. मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाला हा करिष्मा करता आला. त्यानंतर अर्जेंटिनाचा संघ या वर्षी चार मैत्रीपूर्ण सामने खेळला. अर्जेंटिनाच्या संघाने मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये पनामा, कुराकाओ, ऑस्ट्रेलिया व इंडोनेशिया या चारही देशांना पराभूत केले. अर्जेंटिनाचा संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लढत उद्या खेळणार आहे.
मेस्सी याने इंटर मियामी या क्लबशी जोडल्यानंतर त्यांच्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. मेस्सीच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर इंटर मियामी क्लबने लीग करंडकाच्या अजिंक्यपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली. आता क्लब फुटबॉलमध्ये देदीप्यमान यश मिळवल्यानंतर मेस्सी पुन्हा एकदा देशासाठी खेळताना दिसणार आहे.