। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग समुद्रकिनारी 23 ते 27 जानेवारी या कालावधीत लायन्स फेस्टीव्हल भरविण्यात येणार आहे. खाद्यपदार्थांसह वेगवेगळ्या वस्तू प्रदर्शन व खरेदीबरोबरोबरच वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. या फेस्टीवलची तयारी अंतिम टप्प्यात असून गुरुवारी (दि.23) सायंकाळी सहा वाजल्यापासून फेस्टीव्हला सुरुवात होणार आहे.
या महोत्सवात पावणे दोनशेहून अधिक स्टॉल असणार आहेत. त्यात व्हेज, नॉनव्हेज बरोबरच वेगवेगळे खाद्य पदार्थांचे 50 हून अधिक स्टॉल खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. मान्यता प्राप्त सोने, चांदी, हिरे, नामंकित ज्वेलर्स, नामांकित चारचाकी व दुचाकी वाहनांचे प्रदर्शन व विक्री या फेस्टीव्हलमध्ये होणार आहेत. या फेस्टीव्हलचा शुभारंभ गुरुवारी (दि.23) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, लायन्स इंटरनॅशनल संचालक पंकज मेहता, एन.आर. परमेश्वरन, संजीव सुर्यवंशी, प्रवीण सरनाईक, विजय वनगे, प्रितम गांधी आरसीफ थळ कंपनीचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कराओके स्पर्धा हा सांस्कृतिक सोहळा होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विकम पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित लांडे उपस्थित असणार आहेत. दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि.24) सायंकाळी लायन्स अलिबाग श्री 2025 ही शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहे. यावेळी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, माजी उपनगराध्यक्षा अॅड.मानसी म्हात्रे, अॅड. प्रवीण ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तिसर्या दिवशी शनिवारी (दि.25) दुपारी तीन वाजण्याया सुमारास पाककला स्पर्धा व साडीशैली स्पर्धा होणार आहे. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लायन्स अलिबाग टॅलेन्ट हंट कार्यक्रम होणार आहे. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, अपर पोलीस अधीक्षक प्रवीण शिवतारे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक उपस्थित राहणार आहेत.
चौथ्या दिवशी रविवारी (दि.26) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पेट अॅन्ड ब्रीड शो कार्यक्रम होणार असून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास इंडियन आयडॉल फेम श्वेता दांडेकर प्रस्तूत लाटा सुरांच्या हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाही चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, खासदार सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. पाचव्या दिवशी म्हणजे महोत्सवाचा सांगता समारंभ सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे. यावेळी इंडिएसा फ्युजन बँडचा कार्यक्रम होणार आहे. अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम या महोत्सवाची शान वाढवणार आहेत.
लायन्स फेस्टीव्हलने 18 वर्षाची परंपरा जपली आहे. या फेस्टीव्हलच्या माध्यमातून स्थानिक व्यवसायिकांसह बाहेरील उद्योजकांचे स्टॉल उभे राहणार आहे. त्यामुळे स्थानिक व बाहेर बाजारपेठीची माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या फेस्टीव्हलमध्ये महिला बचत गटाचेदेखील स्टॉल आहेत. पाच दिवस होणार्या फेस्टीव्हलमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
नयन कवळे,
अध्यक्ष, फेस्टीव्हल समिती