पालकमंत्री यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन
दोन वर्षांची प्रतीक्षा संपली
। आंबेत । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील माणगाव उपविभागातील म्हसळा तालुका अंतर्गत येणारा आंबेत बागमंडला राज्य मार्ग क्रमांक 100 वरील किलोमीटर 13 या अंतरावरील लिपनिवावे या पुलाचे नुकतेच काम यशस्वीरित्या मार्गी लागले असून, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा पूल सर्व वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते दि 29 मे रोजी करण्यात आले. पालकमंत्री उशिरा पोहोचल्याने ग्रामस्थांना भरउन्हात चार तास ताटकळत प्रतीक्षा करावी लागली.
गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हा पूल नवीन टेक्नॉलॉजिच्या आधारावर हजवाने कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून डिझाइन करण्यात आला असून, मोडकळीस आलेल्या या आंबेत बागमांडला राज्य मार्गावरील लिपनिवावे पुलाला पाच कोटी निधी खर्च करून नवीन पूल तयार करण्यात आले आहे, त्यामुळे प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांच्या चिंतेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या उदघाटनप्रसंगी पालकमंत्री अदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नामदे, उलागडे, गनगणे, राऊत, शेट्टे, म्हसळा तालुका रा.काँ. अध्यक्ष समीर बनकर, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, कृषी सभापती बबन मनवे, नाविद अंतुले,खारगाव सरपंच रसिका वाघरे, उपसरपंच आकाश मोरे यांसह आंबेत खाडीपट्टा विभागातील नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्याने पाच कोटी खर्च करून तयार करण्यात आलेला पूल हा सुसज्ज आणि उंच आहे. बागमंडला राज्यमार्गावरील एक महत्त्वाचा पूल पूर्णत्वास आल्याने येथील नागरिकांना होणारा त्रास आता संपला आहे.
– नाविद अंतुले







