शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा
आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील पाच वर्षीय चिमुकलीच्या हत्येप्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपी किरण भिकू वाघमारे (25, रा. पाटणोली, काजोळी आदिवासीवाडी) याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुंद आणि पेण पोलीस ठाण्याचे पथक करत आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या अमानुष घटनेमुळे पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. चिमुकलीला न्याय मिळावा, आरोपीला जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून जोर धरू लागली आहे.







