रमजानमध्ये पूर्ण 30 रोजे ठेवण्याचा संकल्प
| महाड | प्रतिनिधी |
पवित्र रमजान महिन्यात रोजा (उपवास) ठेवणे हे मोठ्यांसाठी ही आव्हानात्मक मानले जाते. मात्र, महाड शहरातील खारकांड मोहल्ल्यात राहणाऱ्या अवघ्या 8 वर्षांच्या हसनैन हिदायत पठाण या चिमुकल्याने यंदा संपूर्ण 30 दिवस रोजे ठेवण्याचा निर्धार केला आहे.
इतक्या लहान वयात घेतलेला हा संकल्प त्याच्या श्रद्धा, जिद्द आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण ठरत आहे. पहाटे सहरीपासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास पाळत हसनैन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रोजे पूर्ण करत आहे. कुटुंबियांचाही त्याला पूर्ण पाठिंबा असून त्याच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रमजान हा संयम, त्याग आणि ईश्वरभक्तीचा संदेश देणारा पवित्र महिना मानला जातो. हसनैनसारख्या लहान मुलाने घेतलेला हा प्रेरणादायी निर्णय समाजातील इतर मुलांसाठीही आदर्श ठरत आहे. हसनैनच्या या निर्धारामुळे खारकांड मोहल्ल्यात आनंदाचे वातावरण असून अनेकजण त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
