कृत्रिम रेतन पद्धतीतुन 395 वासरांचा जन्म
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. तसेच विकास कामे प्रचंड वेगाने होत आहेत असे असले तरी 2018 च्या पशुगणनेनुसार पनवेल परिसरातील एकूण पशुधन एक लाख 38 हजार 798 आहे. यात गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुकरे, पक्षी, घोडा यांचा समावेश आहे. 2021 मध्ये कृत्रिम रेतन पद्धतीतुन 395 वासरांचा जन्म देण्यात आलेला आहे.
पशुधन हे ग्रामीण भागात चरितार्थाचे महत्वाचे साधन आहे. पशुधन पालनाचे अनेक फायदे आहेत. केवळ चरितार्थच नाही तर, निसर्गाचा समतोल राखण्यात तसेच वनस्पती सृष्टीस पूरक असे हे पशुधन आहे. तालुक्यात शेती सोबतच दुग्ध व्यवसाय केला जातो. पनवेल पंचायत समितीअंतर्गत एकूण 10 पशु वैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. नोव्हेंबर 2021 पर्यंत 10 हजार 58 पशुपक्षी व जनावरांचे उपचार करण्यात आले आहेत. तर 12 हजार 469 जनावरांचे लसीकरण झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. 2020 मध्ये 1 हजार 148 जनावरांचे कृत्रिम रेतन करण्यात आले. यात 426 वासरांना जन्म देण्यात आला. तर 2021 मध्ये 1 हजार 243 कृत्रिम रेतन करण्यात आले. यावेळी 395 वासरांचा जन्म झाला. 2020 मध्ये 141 जनावरांची शस्त्रक्रिया करण्यात आली तर 2021 मध्ये 99 जनावरांची शस्त्रक्रिया करण्यात आली. 2020 मध्ये 93 हजार 398 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. तर 2021 मध्ये 12 हजार 469 जनावराना लस देण्यात आली.