शिलार धरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील चिल्लार नदीवर उभारण्यात येत असलेल्या शिलार धरण याला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या धरणाचे नाव या भागातून कायमस्वरुपी पुसटून टाकायचे आहे, असा निर्धार शिलार धरण संघर्ष समितीने बैठकीत घेतला. पिंगळस येथे प्रस्तावित शिलार धरण प्रकल्पग्रस्त यांची बैठक झाली त्यावेळी हा निर्धार करण्यात आला.

शिलार धरण हद्दपार करण्यासाठी संघर्ष समितीची स्थापन करून पुढील नियोजन करण्यात आले. पिंगळस येथे आयोजित बैठकीत संघर्ष समितीचे दिनेश माधव रसाळ, ॲड. भाऊसाहेब मोरे, ॲड. प्रदीप भोईर, काशिनाथ रसाळ, ॲड. सुदाम धूळे, रवींद्र गोमारे, गणेश रसाळ, छगन सावंत, मंगेश सावंत, कुशल कवठे, संतोश कदम तसेच खांदन, शिलार, शिलारवाडी, धोत्रे आदी परिसरातील गावांमधील 250 ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश रसाळ यांनी आपल्या कर्जत तालुक्यात अनेक प्रकल्प लादले जात आहेत. त्यातच विद्युत प्रकल्प टोरेंट, पोशीर धरण, तसेच शिलात धरण असे अनेक प्रकल्प कर्जतकरांच्या माथी मारण्याचे काम सरकार करत आहे. अगोदरच कोंडाणा धरण अपूर्णस्थितीत आहे ते पूर्ण करावे. ते न करता नवीन धरण बांधण्याचा घाट घातला कशासाठी? असा सवाल करीत या धरणाला विरोध करण्यासाठी शिलार धरण भूमिपुत्र शेतकरी संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी दिनेश माधव रसाळ यांनी उपस्थित केला. भविष्य काळात धरणाला हटवण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन आंदोलने आणि उपोषण करणार असल्याचे जाहीर केले.

Exit mobile version