रायगडशी नाळ जुळलेला लोकनेता

अतुल गुळवणी
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख आणि रायगडचे नातं अतुटचं आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी महाराष्ट्रात प्रभाव पाडला.त्यांच्या या साध्या राहणीने रायगडसहित राज्यातील शेकडो कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी नेहमीच आपुलकी वाटत आलेली आहे.साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यामुळे सर्वसामान्यांमध्येही गणपतरावांविषयी नेहमीच आदरयुक्त भावना निर्माण होत राहिली.

रायगड हा शेकापचा बालेकिल्ला. मुंबईला समिप असल्याने शेकापतर्फे ज्या ज्यावेळी राज्यस्तरावरील आंदोलने केली जात असत त्यावेळी रायगडमधून मनुष्यबळासह कार्यकर्त्यांच्या जेवणाचीही सोय केली जात असतं.त्यामुळे रायगडच्या भूमीशी राज्यातील शेकाप नेत्यांची नाळ जुळली होती.त्यातूनच मग ज्या ज्यावेळी रायगडात शेकापतर्फे जनहितासाठी आंदोलने होत असतं त्यावेळी प्रा.एन.डी.पाटील,गणपतराव देशमुख यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी रायगडात येऊन येथील आंदोलनात हिरीरीने सहभागी होत असतं.

सन 1999 मध्ये राज्यात मोठे सत्तांतर झाले.शिवसेना,भाजप युतीची सत्ता जाऊन राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले.त्या सरकारला शेकापसहित डाव्या आघाडीने पाठिंबा दिला होता.त्यामुळे तत्कालीन विलासराव देशमुख आणि छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील सरकारात शेकापचे गणपतराव देशमुख हे कॅबिनेट तर मोहन पाटील आणि मीनाक्षी पाटील हे राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते.रायगडचे पालकमंत्री म्हणून गणपतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती.पालकमंत्री म्हणून ते प्रथम रायगडात आले तेव्हा मांडवा जेट्टीवर शेकापतर्फे वाजतगाजत त्यांचे स्वागत करण्यात आले.पांढरी पॅन्ट,पांढरा फूल हाताचा शर्ट आणि त्यावर करड्या रंगाचा कोट अशा साध्याच पेहराव्यात आलेल्या गणपतरावांनी पालकमंत्री म्हणून रायगडातील अनेक प्रश्‍न सोडविण्याचा कसोसीन प्रयत्न केला.रायगडातील सर्वच पक्षांचे नेते हे आक्रमक म्हणून ओळखले जातात.त्यामुळे त्या आक्रमक नेत्यांना हाताळण्याची कसरत गणपतराव अगदी लिलया पार पाडत असतं.त्यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणतेची निर्णय बैठकीकच चर्चा करुन घेत असतं.अनेकदा प्रशासकीय अधिकारी,कर्मचार्‍यांवर लोकप्रतिनिधी आरोप,प्रत्यारोप करु लागले तर पालकमंत्री म्हणून ते हस्तक्षेप करीत आणि प्रकरण शांततेते हाताळत असतं.यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्मवय साधला जाई.लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाची दोन चाके आहेत.ती नीट चालली पाहिजेत अशीच त्यांची भूमिका असे.मंत्रालयातही त्यांचे कार्यालय सर्वासामान्यांसाठी खुले असायचे.विधानभवन परिसरातील त्यांना दिलेला सरकारी बंगलाही सर्वासामान्यांसाठी खुलाच असायचा.त्यात गणपतराव कमीच रहायचे अन्य सर्वसामान्य मंडळींचे वास्तव्य जास्त असायचे.या त्यांच्या साध्या राहणीचा प्रभाव नेहमीच सर्वत्र पडत राहिला.

विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात गणपतराव देशमुख यांच्याकडे रोहयोसह पणन हे महत्वाचे खाते होते.त्यावेळी नेहमीप्रमाणे कांद्याच्या दरात मोठी चढउतार होती.कांदा उत्पादकांना दर मिळेणासा झाला होता.अशावेळी गणपतराव देशमुख यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली वारी करुन केंद्राकडे भूमिका मांडली होती.त्यात शेतकर्‍यांना चांगला भाव मिळावा अशीच त्यांची भूमिका होती.

रायगडातील जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडसाद सन 2002 मध्ये राज्याच्या राजकारणात उमटले होते.राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापची साथ सोडून शिवसेनेशी युती केली होती. त्यामुळे शेकापने राज्यातील विलासराव देशमुख सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात आले. शेकापच्या तिन्ही आमदारांनी राजीनामे दिले.त्याचवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही काही आमदार फुटल्याने विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.राजीनामा दिल्यावर गणपतराव देशमुख, मीनाक्षी पाटील आणि मोहन पाटील यांनी त्याच दिवशी सरकारी वाहने आणि बंगल्याचा ताबा सरकारकडे सोपवून दिला होता. पुढे विलासरावांच्या जागी काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्री बनविले.या सरकारात शेकाप सहभागी झाला नाही,मात्र शिंदे सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्यात आला.गणपतराव देशमुख यांचा हाच साधेपणा सर्वांनाच नेहमीच प्रभावीत करीत राहिला.पत्रकार म्हणून त्यांच्या कार्यक्रमाना, पत्रकार परिषदांना उपस्थित राहण्याचा अनेकदा योगही आला.अनेकदा पाहणी दौराही पाहता आला. पण या दौर्‍यात कुठलाहा बडेजाव नसे.मोजकीच सरकारी वाहने,अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या सोबत असतं.प्रत्यक्ष घटनास्थळांवर जाऊन पाहणी करुन संबंधितांना दिलासा देण्याचे कामही गणपतराव अगत्याने करीत असत.त्यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांच्याविषयी आदर निर्माण होत राहिला.तो त्यांच्या पश्‍चातही कायम राहील यात तीळमात्र शंका नाही.
आबांना आदरांजली.

Exit mobile version