। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा शहरात असणाऱ्या गॅस एजन्सी कार्यालयात घरगुती गॅस सिलेंडरसाठी पुन्हा लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आजही गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याचे या रांगेवरून दिसून येत आहे.
रोहे शहरांमध्ये रायकर पार्क येथे भारत गॅस एजन्सीचे कार्यालय आहे. घरगुती गॅस हे जीवनावश्यक असल्याने त्याचा तुटवडा होत असल्याने खूप मोठ्या प्रमाणात रांगा लागत असताना दिसत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व वस्तूचा काटकसरीत वापर करा. असा सल्ला दिल्याने जनता आता भविष्याच्या काळात आपल्याला मोदी सरकार जीवनावश्यक वस्तू देखील पुरवू शकेल की नाही अशी भीती जनतेत तयार झाल्याने सिलेंडर आणण्यासाठी ग्राहकांची धावपळ सुरू असलेली दिसून येत आहे.
शासनाच्या आदेशानुसार सद्या गॅस एजन्सी कडून नवीन कनेक्शन ग्राहकांना दिले जात नाही. त्यामुळे ग्राहकांची अडचण झाली आहे. याबाबत भारत गॅस कार्यालयाशी संपर्क साधला असता घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा अजिबात नाही. ग्राहक वर्ग हे सिलेंडर मिळणार नाही, या भीतीने बुकिंग करत आहेत. व पहिला सिलेंडर संपण्याआधीच बुकिंग झाल्याने दुसरा सिलेंडर घरी पोहोच झाल्यानंतर रिकामा सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या लोकांना सिलेंडर मिळत नाही. भारत गॅस सिलेंडरचा पुरवठा हा मुबलक असून सर्वांना सिलेंडर मिळेल ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी माहिती भारत गॅस एजन्सीच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.







