कोजागिरी पौर्णिमेची आतुरता

कृषी, संस्कृती नैसर्गिक सामाजिक खगोलीय व धार्मिक महत्व

। पाली । वार्ताहर ।

कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. हा भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचा सण आहे. आश्‍विन महिन्यात मध्यरात्रीला असणार्‍या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी चंद्र पूर्णपणे प्रकाशमान असतो आणि त्याचे सौंदर्य विशेषतः पाहण्यासारखे असते. या सणाला कृषी संस्कृतीक, सामाजिक, नैसर्गिक, खगोलीय व धार्मिक दृष्ट्या महत्व देखील आहे.

या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. ही एक खगोलीय घटना आहे. पूर्ण चंद्राच्या प्रकाशात पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहण्यासाठी लोक बाहेर पडतात. रायगड जिल्ह्यात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ठिकठिकाणी जागरण करून लोक विविध सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजनात्मक उपक्रम राबवितात. शिवाय एकत्र येऊन वेगवेगळे पदार्थ करून खातात. सध्या सर्वांना कोजागिरीचे वेध लागले आहेत. यावेळी दूध, तांदूळ, साखर व इतर पदार्थांचे नैवेद्य अर्पण केले जातात. कधी कधी, पारंपरिक गोड पदार्थ देखील बनवले जातात. कोजागिरी पौर्णिमेचा सण विशेषतः पाण्याचे महत्त्व दर्शवतो तसेच धार्मिक रीतिरिवाज यांचे पालन केले जाते.

कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाबद्दल वाटणार्‍या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. घरासमोर लावलेल्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. 
दूध व पाण्याचे महत्त्व कोजागिरीच्या रात्री पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे लोक नदी, तलाव किंवा समुद्र किनार्‍यावर जाऊन चंद्राचे दर्शन घेतात. बर्‍याच ठिकाणी रात्री बाराच्या दरम्यान दूध तापवले जाते. त्यात केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते आटवलेले दूध सर्वजण फस्त करतात.
सामाजिक सलोखा कोजागिरी पौर्णिमेला लोक आवर्जून एकत्र येतात. एकमेकांना गोडधोड वस्तू देतात. शिवाय सोसायटी, आळी, नगर आदी ठिकाणची मंडळी मिळून वेगवेगळे जिन्नस बनवता. आधीच याचे नियोजन केलेले असते. सर्वजण एकत्रीतपणे हा सण साजरा करतात. त्यामुळे समाजामध्ये एकजुटीचा अनुभव मिळतो व सामाजिक सलोखा राहतो. हे चित्र शहर व गावात सर्वत्र पहायला मिळते. यावेळी बच्चे कंपनीची धूम असते. लहान थोर एकत्र येऊन विविध खेळ खेळतात. संगीत खुर्ची, आटापाट्या आदी खेळ खेळले जातात. गप्पा गोष्टी रंगतात, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. नाचगाणी देखील होतात. काही वेळेला राजकीय नेते व पुढारी देखील आवर्जून उपस्थित राहतात. तसेच काही ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम होतात. 
Exit mobile version