स्वच्छ प्रतिमेचा ध्येयवादी नेता गमावला- शरद पवार

सांगोला मतदारसंघातून 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम नोंदवणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राज्यातलं एक जुनंजाणतं नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. मुंबई: कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे आपल्या शोकसंदेशात शरद पवार यांनी नमूद केले आहे. पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली.

Exit mobile version