नेरळच्या डम्पिंग ग्राऊंडमधून धुराचे लोट

नागरिकांना श्‍वसनाचे आजार
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत पंचायत असलेल्या नेरळ मधील वाढते नागरीकरणास येथील कचरा डेपो आता सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. डम्पिंग ग्राउंड कचर्‍याने ओसंडून वाहत असताना आता हेच कचरा डेपो धुराचे लोट सोडत आहेत. त्यामुळे नेरळ गाव विषारी वायूंच्या धुरात लपले जात असून नेरळ ग्रामपंचायतने तयार केलेल्या नवीन कचरा डेपोमुळे त्यात आणखी भर पडली असून नेरळकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान,या कचरा डेपोंकडे नेरळ ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असताना त्या पाठोपाठ ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणारे रायगड जिल्हा परिषदेची यंत्रणा देखील मूग गिळून गप्प आहेत? याबद्दल नेरळ मधील जागरूक नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
नेरळ या नागरीकरणाकडे झुकलेल्या ग्रामपंचायत मधील रहिवाशांच्या सोयीसाठी पाच वर्षापूवी घनकचरा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.नेरळ विकास प्राधिकरण त्या प्रकल्पासाठी निधी देणार होते,मात्र पाच वर्षात ना घनकचरा प्रकल्प साकारला नाही. मात्र नेरळ ग्रामपंचायत कडून दोन नवीन कचरा डेपो मात्र तयार झाले आहेत. कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्याला लागून असलेल्या कचरा डेपो मधील कचरा रस्त्यावर येत असून या कचरा डेपो मध्ये कचरा वाहून नेणारी वाहने जात नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने नवीन कचरा डेपो विकसित केला आहे.या पावसाळ्यापासून नेरळ धरणाच्या खाली असलेल्या पुलाच्या खाली कचरा नेवून टाकला जात आहे. हा कचरा दररोज टाकला जात असून त्यातून निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे परिसरात राहणे कठीण होऊन बसले आहे. पायवाटेने जाणारे आणि तेथे असलेल्या स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार साठी आलेल्या लोकांना नाकाला रुमाल किंवा मास्क लावूनच घाटावर उभे राहावे लागत आहे.पावसाळ्यात तर या कचरा डेपो मधील कचरा नेरळ ग्रामपन्चायत कडून जेसीबी मशीनच्या साहाय्याने महापुराच्या पाण्यात सोडण्यात आला आणि त्यामुळे उल्हास नदीचे प्रदूषण वाढले असताना पाटबंधारे विभाग काहीही कारवाई करताना दिसत नाही.
आता मात्र नेरळ ग्रामपन्चायत या कचरा डेपोंमधून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. त्यामुळे धुराचे लोट दिवसभर नेरळकरांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. त्यात रात्री तर सर्वत्र शांतता पसरल्यानंतर हा विषारी वायू वाहून नेणारा धूर जनतेचे आरोग्य धोक्यात आणत आहे. या धुरामुळे नेरळकरांना श्‍वसनाचे आजार जडले आहेत.दुसरीकडे धरणाच्या परिसरात राहणार्‍या लोकांना दारे खिडक्या बंद ठेवूनच राहावे लागत असल्याने असे कुटुंबीय गुदमरत आहेत. मात्र याचे काहीही सोयरसुतक नेरळ ग्रामपंचायतला नाही. तर कचर्‍यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असतांना त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी हि रायगड जिल्हा परिषदेची असते. मात्र वायू प्रदूषण रोखण्याचे कोंणतेही काम जिल्हा परिषद कडून होताना दिसत नाही आणि या कचरा डेपोबाद्द्ल जिल्हा परिषद हस्तक्षेप करीत नाही. रायगड जिल्हा परिषदेच्या या भूमिकेबद्दल देखील कुतूहल निर्माण झाले आहे.

Exit mobile version