निष्ठावान कार्यकर्ते फक्त शेकापनेच घडवले – आ. जयंत पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांची टिम फक्त शेतकरी कामगार पक्षाने वेगवेगळ्या क्षेत्रात तयार केली असून या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. गरीब कष्टकरी माणुस कधीच फसवत नाही. त्याचे काम केले त्याची तो जाणीव ठेवतो असे उद्गार शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी काढले.

आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पीएनपी नाटयगृहाच्या पुर्नउभारणीचा संकल्प सोडण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आरडीसीसी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम, माजी आमदार धैर्यशिल पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अस्लम राऊत, शेकापचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, आरडीसीसी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, संचालक शंकरराव म्हसकर, प्रिता चौलकर आदी उपस्थित होते.
यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले की, सहकार तत्वावरील राज्यातील पहिले नाटयगृह होते. या नाटयगृहासाठी एकही रुपयाचे कर्ज नव्हते घेतले. सभासदांच्या सहकार्याने हे उभे केले. बराचसा निधी वैयक्तिकरित्या दिला. तत्कालिन मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, तत्कालिन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी काही निधी दिला. नाटयगृह जळताना बघताना मी खूप नाराज झालो होतो. दहा वर्षे हे नाटयगृह उभे करण्यासाठी मी मेहनत घेतली. तोटयात असताना देखील हे नाटयगृह जिद्दीने चालवले. आज पुन्हा उभे करण्यासाठी कलाकारांनी आम्हाला स्फुर्ती दिली. अलिबागमध्ये कलाकार आम्हाला आता व्यासपीठ नाही म्हणून अक्षरशः दोन दिवस रडत होते. त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने नाटयगृह उभे करताना मागील चुका टाळण्याचा प्रयत्न करु. तीन चार महिन्यात पुर्ण करु असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वेगळे काम आयुष्यात केले आहे. निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांची टिम शेतकरी कामगार पक्षाने वेगवेगळ्या क्षेत्रात तयार केली. सकाळपासून मला हजारो लोक भेटले. जे गरीब लोक येतात ते प्रेमाने येतात. त्यांचा जास्त आनंद वाटतो. त्यांच्याबद्दल जास्त आपुलकी वाटते. गरीब कष्टकरी माणुस कधीच फसवत नाही. त्याचे काम केले त्याची तो जाणीव ठेवतो. हे देखील त्यांनी नमुद केले. विविध जाती धर्माचे लोक आपण मित्र बनवले आहेत. विविध क्षेत्रात काम करताना एक वेगळा आनंद मला मिळाला. राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, सहकार कोणतेही क्षेत्र असो. तिथे नाविण्यपुर्ण काम करायचे आणि त्याचा दर्जा राखायचा हे आयुष्यात केले. जो मान आणि सन्मान आम्हाला आहे तो वेगळा आहे. तो पैशाने मिळणार नाही. तो कुणाला विकत घेऊन मिळणार नाही, तो कष्टाने आणि कामाने मिळाला असल्याचे जयंत पाटील म्हणाले. या जिल्ह्यामध्ये निष्ठावंत आणि वैचारिक दृष्टया बैठक असलेले फक्त शेकापक्षातच आहेत. विचार आणि गरीबाची बांधीलकी ठेवणारे कार्यकर्ते आपणच तयार केले त्याचा अभिमान आहे. आदिवासी वाडीवर विविध माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. दिलेला शब्द आपण पुर्ण करतो. विचार पक्का असला पाहिजे आणि शोबाजी काय कामाची नाही. हिंदूत्वाचे नाव घेऊन कसली लढाई करता आम्ही काय मुसलमान आहोत. अल्पसंख्याकांना आपण मदत केली पाहिजे. रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाला संरक्षण देण्याचे काम शेकापक्षाने केले असल्याचेही जयंत पाटील यांनी नमुद केले.

सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम म्हणाले की, नाटयगृहाची दुर्घटना कळल्यानंतर खुप वाईट वाटले. पुन्हा उभे राहील असे वाटत नव्हते. मात्र अलिबागकर खूप नशिबवान आहेत की तुम्हाला आ. जयंत पाटील यांच्या सारखे नेतृत्व तुमच्या सोबत आहेत. दीड दोन महिन्यातच हे नाटयगृह उभे राहील. स्थानिक कलाकारांसह आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

आ. धैर्यशिल पाटील म्हणाले की, पीनएपी नाटयगृह राखेतून पुन्हा उभे राहण्यासाठी नवनिर्माण साधला जात आहे हे आनंदाची गोष्ट आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये कलाकारांप्रमाणेच पुढारी देखील काम करीत असतात. प्रत्यक्ष समस्येमधून क्षणभराची विश्रांती कलाकार कलेच्या माध्यमातून कलाकार देत असतात. त्याच प्रमाणे त्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्या समस्येला भिडण्याचे काम राजकीय कार्यकर्ते करीत असतात. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील या परिसरातील अनेक समस्यांना भिडण्याचे काम आ. जयंत पाटील करीत आहेत. समाजाचे आयुष्य कशाप्रकारे सुखाचे होईल हे देखील जयंत पाटील पहात असतात. अष्टपैलू खेळाडूप्रमाणे जयंत पाटील हे सर्व क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून आपली भुमीका बजावून प्रत्येक क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे.

दिवा सुरुवातीला जेवढा मोठा होतो. तेवढाच तो लवकर विझतो. असाच प्रकार इथल्या फडफडणार्‍यांची होणार असल्याची टिका कोणाचेही नाव न घेता आमदार जयंत पाटील यांनी केली.

Exit mobile version