लम्पी प्रतिबंधक कारवाई सुरू

पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे तालुका लम्पी नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. यासाठी आरोग्य विभागाने तालुकास्तरीय समिती स्थापन केली असून लक्षणे दिसल्यास तत्काळ नमुने प्रयोग शाळेत पाठवून निदान केले असल्यामुळे लम्पीविरोधात तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे.

लम्पी चर्मरोगावर नियंत्रण प्रतिबंध किंवा त्याचे निमूर्लन करण्यासाठी प्रशासनाने मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी असलेल्या ठिकाणांपासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधित झालेल्या जनावरांच्या संपर्कात आलेला चारा, गवत किंवा इतर साहित्य आणि अशा जनावरांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली आहे.

पनवेल तालुका लम्पी संरक्षित क्षेत्र असले, तरी यापुढे या रोगाचा प्रादुर्भाव परिसरात होऊ नये, म्हणून सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. तत्काळ माहिती मिळवण्याच्या दृष्टीने गावपातळीवर समित्या तयार केल्या आहेत.

– विजय तळेकर, तहसीलदार

लम्पी आजार जरी संसर्गजन्य असला, तरी तो योग्य वेळी योग्य उपचाराने बरा होतो. नागरिकांनी घाबरायचे काही कारण नाही. आपल्या जणावरांची व्यवस्थित काळजी घेऊन या रोगाला प्रतिबंध करू शकतो.

– डॉ. व्ही. जी. पाटील, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, पनवेल



Exit mobile version