मुरुड | वार्ताहर |
एसटी कर्मचार्यांच्या संपाची दखल सरकारने घ्यावी यासाठी विजय मोरे या एसटी कर्मचार्याने आपल्या दुचाकीलाच प्रतिकात्मक एसटी बनविले आहे. या वाहनातून ते विविध आगारात जाऊन तेथील संपकरी कर्मचार्यांना प्रोत्साहन देत असतात.
विजय मोरे मूळचे महाड रायगड येथील रहिवासी आहेत.त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी याविषयीच्या आपल्या भावना आमच्याशी बोलताना व्यक्त केल्या ते म्हणाले की मी गेली 28 वर्ष अविरतपणे एसटीचालक म्हणून काम केले ,एसटी व जनतेची सेवा केली. एसटी बंद ठेवून आम्हाला कुठल्याही प्रकारचा आनंद होत नाही आहे परंतु या लढ्यामध्ये राज्यशासनाने आमचा विचार करणे गरजेचे आहे. कित्येक वर्ष शासनाने आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत त्यामुळे हा लढा लढणे हे आमच्यासाठी फार गरजेचे होते. हा लढा लढत असताना आमच्या काही कर्मचारी बांधवाना वीरमरण आले आहे.त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी हा अनोखा मार्ग निवडला आहे.चालक म्हणून एसटी पासून दूर राहणे मलाही दुःखदायक आहे त्यामुळेच मी माझ्या दुचाकीला एसटीची प्रतिकृती बनवून अनेक डेपो मध्ये फिरत असतो जेणेकरून मला माझी लालपरी माझ्याजवळ आहे असा भास होतो आणि ज्या माझ्या बांधवांनी या लढ्यालासाठी बलिदान दिले आहे त्यांना या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करतो. राज्यशासनाला जाग येण्यासाठी अशाप्रकारे मी ठीकठिकाणी फिरत असतो.. लवकरच आमच्या लढयाला यश येऊ दे आणि राज्यसरकारला देव सुबुद्धी देवो अशी प्रार्थना करून त्यांनी आपले मनोगत संपवले.
खरंच आज असे अनेक चालक,वाहक आणि एसटीतील इतर कर्मचारी यांचे संसार उघड्यावर आले आहेत लवकरच या लालपरीसाठी काहीतरी तोडगा निघावा आणि महाराष्ट्राची शान असलेली लालपरी पुन्हा दिमाखात रस्त्यावर धावावी हीच अपेक्षा.
विजय मोरे,एसटी कर्मचारी