महाड-रायगड राष्ट्रीय महामार्ग होणार ‌‘छत्रपती महामार्ग’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती

| महाड | प्रतिनिधी |

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी भेट घेत, रायगडाच्या दिशेने जाणाऱ्या महाड-रायगड राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या रस्त्याचा ऐतिहासिक आणि भावनिक वारसा लक्षात घेता त्याला ‌‘छत्रपती महामार्ग’ असे नाव देण्याची मागणी मांडली. त्यास मंत्री गडकरींनी मान्यता दिल्याची माहिती संभाजी राजे छत्रपती यांनी समाज माध्यमांद्वारे दिली आहे.

पूर्वी छोटा व वळणावळणाचा असलेला हा रस्ता 206 कोटींच्या निधीमधून विकसित होत आहे. जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले असून, शिवराज्याभिषेकाच्या काळात होणारी लाखोंची ऐतिहासिक गर्दी आणि नियमित वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोठी सुविधा ठरते आहे. या महामार्गावर शिवजन्म ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास, पथदिवे, विश्रांतीस्थळे, ऐतिहासिक शिल्पं व सांस्कृतिक दर्शन घडवणारे घटक असावेत, अशी संकल्पना संभाजी राजे यांनी मांडली0 यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वाढीव निधीची तरतूद कशी करता येईल, यावरही मार्गदर्शन केले. दरम्यान, युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने आणि लाखो शिवभक्तांच्यावतीने मंत्री गडकरी यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version