महाड घेणार मोकळा श्‍वास; शहरातील अतिक्रमणे हटणार

हातगाड्या जप्तीचे आदेश

। महाड । प्रतिनिधी ।

महाडचे रस्ते लवकरच मोकळा श्‍वास घेणार आहेत. शहरातील वाढती अनधिकृत बांधकामे आणि रस्त्यांवर व्यवसाय करणार्‍या हातगाडी व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार आहे. त्याबाबतचे निर्देश मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिले आहेत.

शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना प्रमुख रस्त्यावर अतिक्रमणे देखील वाढत आहेत. फळभाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या बेशिस्तपणे रस्त्यावर उभ्या केल्या जातात. त्यामुळे रहदारीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. काही मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. दुकानासमोर असलेली अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावीत तसेच भाजी विक्री करणार्‍या हातगाड्या रस्त्यावर उभ्या करू नये, अन्यथा हातगाड्या जप्त करण्यात येतील, असे रोडगे यांनी स्पष्ट केले आहे.

रहदारीची ठिकाणे
महात्मा गांधी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, त्याचप्रमाणे बालाजी मंदिर परिसर, लायन्स क्लब बिल्डिंग, नवेनगर परिसर ही शहरातील अधिक रहदारीची व गर्दीची ठिकाणी आहेत. याच मार्गावर असलेल्या दुकानदारांनी अतिक्रमण केले असल्याने रहदारीला अडचणी निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे फळ आणि भाजी विक्री करणार्‍यांच्या हातगाड्या रस्त्यावर उभ्या करून विक्री करणार्‍यांमुळे वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्त वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने रस्त्यावरून पादचार्‍यांना चालण्यासाठी जागाच राहत नाही. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो, असे शहरातील ज्येष्ठ नागरिक विनोद बुटाला यांनी सांगितले.

वाहतूक सुरक्षेकडे पोलिसांचे दुर्लक्ष्स
पोलीस विभागाकडून वाहतूक समस्येकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचप्रमाणे संपूर्ण शहरासाठी दोन किंवा तीन पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रणाकरिता नेमण्यात आलेले आहेत. अशी माहिती मिळाली आहे. पोलीस कर्मचारी वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करण्याकडे अधिक लक्ष देत असल्याने वाहतूक समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. गणेशोत्सव काळामध्ये ग्राहकांची गर्दी बाजारपेठेत वाढणार आहे. त्यापूर्वी रस्त्यावरील अतिक्रमणे व बेशिस्त हातगाड्या, वाहन पार्किंग हटवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सर्वच ठिकाणी वाहतूक समस्या निर्माण झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकाला रस्त्यावरून चालणेदेखील अशक्य झाले आहे. शहर व्यापारी संघाने शहरातील अतिक्रमणे व वाहतूक समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. वाहतूक कोंडी आणि समस्येबाबत संबंधित यंत्रणेला वारंवार कळवण्यात येऊन कार्यवाही होत नाही. गणेशोत्सवापूर्वी शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यात यावी.

निलेश पवार, अध्यक्ष, महाड पत्रकार संघ

गणपती उत्सवासाठी लागणार्‍या साहित्यांची दुकाने सजली आहेत. ग्राहकांची वर्दळ येत्या काही दिवसात वाढणार आहे. भक्तांना गर्दीचा त्रास, गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही व उपाय करण्यात येणार आहे.

महादेव रोडगे, मुख्याधिकारी
Exit mobile version