महाड | प्रतिनिधी |
मुळ गांव महाड आणि शिक्षण पूर्ण केल्या नंतर मुंबई पुणे सुरत सारख्या मोठ्या शहरात स्थायिक झालेल्या असंख्य भूमी पुत्रांनी पुरग्रस्त महाडकरांसाठी सढळ हस्ते मदत पाठवली. कोरोना काळात आपली कर्मभूमी मुंबापुरीतील समाज बांधव आणि इतर जनतेसाठी आरोग्य सुविधा व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात अग्रेसर राहणारे महाडचे सुपुत्र बबन खैरकर, अध्यक्ष – गोरा कुंभार समाज मंडळ मुंबई आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शुभांगी बबन खैरकर शिवसेनेच्या नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख यांनी महाड शहरातील पुरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी महाड मध्ये धाव घेऊन समाजातील गरजु व गरिब कुटुंबांना आवश्यक असणारे अन्न धान्य व इतर साहित्याचे वाटप केले यावेळी गोरा कुंभार समाज मंडळ मुंबईचे सचिव संतोष पेंडकलकर, खजिनदार तृप्तेश पावसकर तसेच संपर्कप्रमुख ,विभागप्रमुख ,सदस्य ,सभासद ,महीला आघाडीतील सर्व महीला पदाधिकारी आदी उपस्थित होते.
त्याच बरोबर कुंभार आळी भोई घाट व सरेकर आळी परिसरात पुर परिस्थिती ओढवल्यानंतर काही जीगरबाज तरुणांनी आपल्याकडे आधुनिक साधन सामुग्री नसतानाही अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून त्यांचे प्राण वाचवले. अशा जिगरबाज तरुणांचा श्री व सौ शुभांगी बबन खैरकर यांनी यथोचित गौरव करून त्यांना लाईफ जॅकेट चे वाटप केले. बबन खैरकर यांच्या सारख्या असंख्य महाडकरांनी आपल्या गावाशी असणारी नाळ मदतीचा हात देऊन आणखी घट्ट केली. समस्त महाडकरांकडून अशा भूमी पुत्रांचे कौतुक केले जात आहे