| सुधागड-पाली | वार्ताहर |
आषाढातील पहिला दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोमसाप शाखा पाली सुधागड तर्फे या दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम राबविण्यात आले. पाली शाखेचे अध्यक्ष धनंजय गद्रे गुरुजी यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास ज्येष्ठ कवी व कोमसाप पाली शाखेचे माजी अध्यक्ष शांताराम सोनार, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाखेचे माजी सहकोषाध्यक्ष श्री. दांडेकर, शाखेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सल्लागार सुरेश पोतदार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास वक्ते म्हणून प्रसिद्ध कीर्तनकार समाजभूषण व रायगड भूषण पुरस्कार प्राप्त किरण महाराज कुंभार (कृष्णकांत स्वामी) हे होते. पाली शाखेचे अध्यक्ष धनंजय गद्रे यांनी गणेश स्तवन सादर केले व कार्यक्रमास सुरुवात झाली. धनंजय गद्रे यांनी प्रास्ताविक केले व कोमसाप पाली सुधागडच्या आगामी वर्षांतील कार्यक्रमांचा आढावा आणि माहिती करुन दिली.
यावेळी सुरेश पोतदार यांनी धनंजय गद्रे गुरुजी यांना मिळालेल्या रायगड भूषण पुरस्काराबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. शांताराम सोनार यांनी उत्तम काव्यपेरणी करत अध्यक्षीय भाषण खुलविले व उपस्थितांची मने जिंकली. यावेळी महाकवी कालिदासांचे त्यांच्या जीवनातील उत्तम पैलू मांडण्यात आले. माऊलींच्या अभंगवाणी व प्रवचनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. सौ.खाडिलकर यांनी सुश्राव्य स्वरात पसायदान सादर केले.
या कार्यक्रमाला श्री. खाडिलकर काका, महेश शिधोरे, गुरव काका, सौ. भिडे, सौ. अभ्यंकर, सौ. चांदोरकर, श्री. शिंदे महाराज, मृदंगमणी सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाखेचे उपाध्यक्ष संतोष वडके यांनी केले.